आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Jalgaon Zilha Parishad Work To Private Institute Khadse

जळगाव जिल्हा परिषदेचे काम खासगी संस्थेकडे द्या - खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत माझ्या मतदारसंघात कामे झालेली नाहीत. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही ‘जलयुक्त’च्या कामांची बोंबाबोंब असून, या कामांबाबत मी समाधानी नाही. तसेच जिल्हा परिषदेचे कामही समाधानकारक नाही. त्यामुळे ‘जलयुक्त’ची कामे चांगल्या खासगी संस्थेकडे द्या, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले.

जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री खडसे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी खरीप हंगामासाठी विविध यंत्रणांनी केलेल्या नियोजनाची ‘जलयुक्तशिवार’ अभियानाची माहिती देत असताना खडसे यांनी त्यांना मध्येच थांबवत जिल्हा परिषद लघुसिंचन, कृषी विभाग, जलसंपदा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत तालुकानिहाय झालेल्या कामांचा आढावा घेतला. मुक्ताईनगर मतदारसंघात कोटी ४७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, त्यापैकी केवळ १० कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर वर्षभरापूर्वी मान्यता देऊनही कामे होत नसल्याचे मला आश्चर्य वाटते. माझ्या मतदारसंघात कामे होत नसतील तर अवघड परिस्थिती आहे, असे म्हणत खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही आता काहीच सांगू नका; खरिपाच्या बैठकीचे मुद्दे सांगा’ असे सांगितले. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अामदार हरिभाऊ जावळे, किशोर पाटील, स्मिता वाघ, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

शासनाची फसवणूक...
या वेळी आमदार किशोर पाटील यांनीही ‘जलयुक्त’च्या कामांवरून अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘जलयुक्त’च्या कामांबाबत कागदांचा खेळ करून संबंधित एजन्सी राज्य शासनाची फसवणूक करत आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या कामांमध्ये विसंगती असल्याचेही पाटील म्हणाले.

जामनेरात सर्वाधिक कामे
जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत ७१ कामे मंजूर झालेली आहेत. तसेच त्यापैकी २१ कामे पूर्ण झाली अाहेत. जामनेर मतदारसंघात ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सर्वाधिक कामे झाल्याच्या माहितीनंतर हरिभाऊ जावळे यांनी रावेर यावल तालुका अधिकाऱ्यांना दिसत नसल्याची टीका केली.