आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा अनर्थ टळला: भुसावळात गोवा एक्स्प्रेसच्या इंजीनमधून डिझेल गळती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील लोखंडी पुलावर 12780 अप गोवा एक्स्प्रेसच्या इंजीनमधून मोठय़ा प्रमाणावर डिझेलची गळती झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी 8.25 वाजता घडला. मोठय़ा प्रमाणावर गळती झाल्याने पुलाखाली पडणारे डिझेल भांड्यात साठवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. या सर्व प्रकारामुळे गाडीला 20 मिनिटे उशीर झाला.

नागपूरहून गोव्याकडे जाणारी गोवा एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी रविवारी सकाळी भुसावळ स्थानकावरून मार्गस्थ झाली. त्याचवेळी गाडीच्या इंजीनमधील डिझेलचा पाइप लिकेज झाल्याने इंजीनातून मोठय़ा प्रमाणावर डिझेलची गळती सुरू झाली. गळती सुरू असतानाच गाडी लोखंडी पुलावर येऊन थांबली. यामुळे पुलाखालून जाणार्‍या वाहनधारकांच्या अंगावर डिझेल पडल्यामुळे गोंधळ उडला. काही वेळातच मिळेल त्या साधनात डिझेल साठवण्यासाठी एकच झुंबड उडाली. रस्त्यावर पडलेल्या डिझेलमुळे काही दुचाकी वाहनधारक घसरून पडले. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. डिझेल गळतीची माहिती मिळताच रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागाचे निरीक्षक आर.एस.काकडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत गळती थांबवली. या सर्व गोंधळात गाडीचा 20 मिनिटे खोळंबा झाला. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

धोकेदायक घटना
रेल्वेच्या इतिहासात यापूर्वीही अग्निकांडाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेगाडीच्या इंजीनमधून झालेली डिझेलगळती मोठय़ा दुर्घटनेचे कारण ठरू शकते. सुदैवाने गोवा एक्स्प्रेसच्या इंजीनमधील गळतीचा प्रकार लवकर लक्षात आला. वेळीच उपाययोजना केल्याने मोठा अपघात टळला.
शहरातील लोखंडी पुलावर गोवा एक्स्प्रेसच्या इंजीनातून गळती होणारे डिझेल घरी घेऊन जाण्यासाठी काही जणांनी तर चक्क अशा बादल्या ठेवल्या.

झुंबड उडाली
लोखंडी पुलावर रेल्वे इंजीनमधून डिझेलची धार लागली. पुलाखालून जाणार्‍या वाहनचालकांच्या अंगावर हे डिझेल उडाले. पंधरा मिनिटे तर या डिझेलसाठी झुंबड उडाली.