आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलाणी मार्केटमधून 13 हजारांच्या फुलांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर असलेल्या सात फूल विक्रेत्यांच्या दुकानांतून 3 आॅगस्ट रोजी रात्री 1.15 ला 13 हजार 300 रुपयांचे फुलांचे हार, झेंडूची आणि गुलाबाची फुले चोरीस गेली आहेत. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

दरम्यान, दुकानदारांनी रविवारी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तीन चोरटे चोरी करताना आढळून आले आहेत. हे फुटेज पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे दुकानदारांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. तळमजल्यावरील गायत्री फूल भंडारच्या संचालिका मंगला बारी यांच्या दुकानाबाहेर लावलेल्या सहा सीसीटीव्ही कॅमर्‍यांमध्ये हे चोरटे कैद झाले आहेत. केवळ 15 मिनिटांत त्यांनी सात दुकानांतील फुलांची पोती फोडून चोरी केली आहे. या चोरट्यांना काही दुकानदारांनी ओळखलेदेखील आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरच त्याची ओळख सांगून ते पोलिसांची मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रावण सोमवारसाठी होता माल
ऑगस्टच्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने फूल विक्रेत्यांनी हा माल आगाऊ मागवला होता. पहाटे उशीर होऊ नये म्हणून काहींनी फुलांचे हारदेखील तयार करून ठेवले होते. यातील काही दुकानदारांनी घरपोच डिलिव्हरीच्या बोलीवर हारांच्या आॅर्डरी घेऊन ठेवल्या होत्या. चोरी झाल्यामुळे ते फुलांचे हार पोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हा आहे चोरीस गेलेला माल
संजय बारी यांच्या दुकानावरील फुलांचे 300 हार : किंमत 3 हजार रुपये
मंगला बारी यांच्या दुकानावरील 40 किलो झेंडूची फुले : किंमत 4 हजार 800 रुपये
बापू धनगर यांची गुलाबाची 100 फुले आणि 100 हार : किंमत 1500 रुपये
धनंजय बारी यांचे 100 गुलाब, 20 मोठे हार : किंमत 900 रुपये
राहुल बारी यांचे 100 गुलाब, 45 हार : किंमत 1 हजार रुपये

वसंत बारी यांचे 30 हार, 100 गुलाब
: किंमत 1350 रुपये
रघुनाथ बारी यांची 10 किलो झेंडूची फुले
: किंमत 1200 रुपये
आदल्या दिवशी पाहणी
या तिन्ही चोरट्यांनी चोरी करण्याच्या एक दिवस आधी सकाळी गोलाणी मार्केटमध्ये येऊन फुलांचे भाव विचारले होते. सकाळी पाहणी करून गेल्यानंतर चोरट्यांनी रात्री त्याच दुकानांमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.