आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलाणी घोटाळ्याची फाइल केली ‘क्लोज’, पोलिसांच्या स्मरणपत्राकडे पालिकेची टाळाटाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - २२० कोटींच्या गोलाणी मार्केट सतरा मजली बांधकामाच्या घोटाळा प्रकरणाची फाइल शहर पोलिसांनी बंद केली आहे. या घोटाळा प्रकरणात माजी आमदार सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह सुमारे १५० पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वत: शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. यामुळे जळगावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी शासनाचा विशेष लेखा परिक्षण अहवाल सादर करण्यात यावा, अशी दोन स्मरणपत्रे शहर पोलिसांनी महापालिकेला पाठवली होती. मात्र, पालिका प्रशासनाने या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. अखेर तीन महिन्यांची मुदत संपल्याने पोलिसांनी ही तक्रारच निकाली काढून टाकली. विशेष म्हणजे याप्रकरणी तीन महिन्यांच्या आत कार्यवाही करावी, असे आदेश आैरंगाबाद खंडपीठाने शासनाला दिले होते, मात्र पालिकेच्या दिरंगाईमुळे हे प्रकरण आता थंडबस्त्यात गेले अाहे.

घरकुल घाेटाळ्यात अामदार सुरेश जैन यांच्यासह मातब्बरांना जेलची हवा खावी लागली अाहे. त्यापाठाेपाठ गाेलाणी मार्केट अर्थात व. वा. व्यापारी संकुलाच्या उभारणीदरम्यान १९८८ ते २००१मध्ये करण्यात अालेले बेकायदा ठराव अनियमिततेप्रकरणी पालिकेचे सुमारे २२० काेटींचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढत पालिका अायुक्त संजय कापडणीस यांनी गेल्या वर्षी जुलै २०१५मध्ये शहर पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला हाेता. यात गुन्हा दाखल हाेत नसल्याने भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशाेक लाडवंजारी यांनी अाैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली हाेती. त्यात खंडपीठाने तीन महिन्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार महापालिकेने मागणी केल्याप्रमाणे शासनाचे विशेष लेखा परिक्षणही सुरू झाले. ही मुदत २१ जून २०१६पर्यंत होती. २१ जून राेजी तीन महिन्यांची मुदत संपल्याने शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी महापालिका अायुक्तांना पत्र पाठवून गाेलाणीप्रकरणी अायुक्तांनी केलेली तक्रार निकाली काढत असल्याचे कळवले अाहे.

दाेन वेळा स्मरणपत्र : महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल हाेत नसल्याने अशाेक लाडवंजारी यांनी क्रीमिनल रिटपिटिशन क्रमांक २६५/१६ दाखल केली होती. या याचिकेवर खंडपीठाने तीन महिन्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले हाेते. यादरम्यान शहर पाेलिसांनी २२ एप्रिल २०१६ ३१ मे २०१६ राेजी असे दोन वेळा महापालिका अायुक्तांना स्मरणपत्र देऊन गाेलाणीच्या बांधकामासंदर्भात विशेष लेखा परिक्षण अहवालाची मागणी केली होती. तसेच अहवाल मिळाल्यास अर्ज निकाली काढण्याचा इशाराही दिला हाेता. परंतु, पाेलिसांच्या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने गोलाणी प्रकरणात अायुक्तांनी दिलेला तक्रार अर्ज (क्रमांक ८२/२०१५ ) निकाली काढत असल्याचे पत्र शहर पोलिसांनी महापालिकेला दिले.

जैन यांच्यासह १५० पदाधिकाऱ्यांना दिलासा : अायुक्तांनी दिलेला तक्रार अर्ज निकाली काढल्यामुळे माजी अामदार सुरेश जैन यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांना माेठा दिलासा मिळणार अाहे. गेल्या चार वर्षांपासून पाेलिस न्यायालयीन चाैकशांमध्ये अडकलेल्या जैन समर्थक सुमारे १५० लाेकप्रतिनिधी सुुटकेचा श्वास साेडणार अाहेत. या तक्रारीत माजी अामदार सुरेश जैन, माजी महापाैर प्रदीप रायसाेनी तसेच सन १९८८ ते २००१ या कालावधीतील नगराध्यक्ष, मुख्याधिकारी नगरसेवकांवर ठपका ठेवण्यात अाला हाेता.

पूर्तता केल्याने काढला निकाली : अाैरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत तीन महिन्यांची मुदत दिली हाेती. त्यानुसार दाेन वेळा स्मरणपत्र देऊनही महापालिकेने विशेष लेखा परिक्षणाचा अहवाल दिला नाही. त्यामुळे तक्रार प्रलंबित ठेवण्यात अर्थ नव्हता. यामुळे अायुक्तांनी दिलेला तक्रार अर्ज निकाली काढला अाहे. अाता जेव्हा पालिका विशेष लेखा परिक्षण अहवालासह नव्याने तक्रार देईल त्यानंतरच पुढची कार्यवाही हाेईल, असे शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर म्हणाले.

नव्याने तक्रार करावी लागणार : गोलाणी प्रकरणात पालिकेकडून विशेष लेखा परिक्षण देण्यास दप्तर दिरंगाई झाली, की मुद्दाम टाळाटाळ करण्यात आली? असा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षी तक्रार देणारे पालिका आयुक्त संजय कापडणीस यांची बदली झाली आहे. तसेच तक्रार अर्ज निकाली काढल्यामुळे यापुढे कारवाई करावयाची असल्यास नव्याने तक्रार द्यावी लागणार आहे. कापडणीस यांच्या जागी नियुक्त झालेल्या नव्या आयुक्तांना याप्रकरणी तक्रार करावयाची असल्यास संपूर्ण घोटाळ्याचा पुन्हा अभ्यास केल्यानंतरच तक्रार देणे शक्य होणार आहे, त्यामुळे हे प्रकरण आता थंडबस्त्यात गेल्यातच जमा अाहे.

माहिती घेऊन कार्यवाही करू : अायुक्त : नुकताच पदभार घेतलेला असल्याने या विषयाची पुर्ण माहिती नाही. त्यामुळे गाेलाणी मार्केटच्या तक्रारीचा अभ्यास करून पुढची भुमीका ठरवली जाईल, असे मनपा अायुक्त किशाेर बाेर्डे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...