आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिकमचंद जैननगरात दिवसा सोनसाखळी लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रात्री सोनसाखळी लांबवणार्‍या चोरट्यांनी आता पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरदिवसादेखील धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजता भिकमचंद जैननगरात पाणी पिण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी वसुमती रामगोपाल खंडेलवाल यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रुपये किमतीची पोत लांबवली. ही घटना जळगावकरांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तसेच पोलिस प्रशासन चोरट्यांपुढे हतबल झाल्याचेही हे संकेत आहेत.
वसुमती खंडेलवाल या रविवारी अंगणात उभ्या होत्या. या वेळी दोन युवक मोटारसायकलीने तेथे आले. त्यांनी वसुमती यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली. त्यांनी घरातून पाण्याचा ग्लास आणून दुचाकीचालकाच्या हाती दिला. तेवढय़ात मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 6 ग्रॅमची सोन्याची पोत ओढून दोघे पसार झाले. खंडेलवाल यांनी आरडाओरड केली; मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सामान्यांनीच केले एकाला जेरबंद
गेल्या रविवारी रात्री मुक्तांगण मंगल कार्यालयाजवळ सोनसाखळीचोरीच्या घटनेत सर्पमित्राने चोराचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे प्रत्येक घटनेच्या वेळी चोरट्यांना पकडण्यासाठी नागरिकच पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

इगल पथक ‘फेल’
रविवारच्या घटनेमुळे आता चोरट्यांची हिंमत भरदिवसा चोरी करण्यापर्यंत गेली आहे, तर दुसरीकडे सोनसाखळी चोरांना अटक करण्यात पोलिस प्रशासन सपशेल ‘फेल’ ठरत आहे. शहरासह जिल्ह्यात दोन-तीन दिवसाआड सोनसाखळी चोरीची एक घटना घडत आहे. तरीदेखील एकही चोरटा पोलिसांना अद्याप गवसलेला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोनसाखळीचोरांना पकडण्यासाठी ‘ईगल’ हे विशेष पथक पोलिसांनी तयार केले होते; परंतु या ‘ईगल’ पथकाने आजपर्यंत एकही चोरटा पकडलेला नाही. सर्वच पोलिस ठाण्यांतील डीबी (डिटेक्टिव्ह ब्रॅँच) व गस्ती पथक दिवसभर शहरात फिरत असते; मात्र त्यांनादेखील सोनसाखळीचोरांचा बंदोबस्त करण्यात फारसे यश आले नाही. याउलट अशा घटनांमध्ये वाढच होत आहे.