आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णनगरीने जोपासली विश्वासार्हता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सोन्याच्या भावात आठवडाभरात तीन हजार 400 रुपयांची विक्रमी घसरण झाली. भाव कमी झाल्याने ग्राहक आनंदी असला तरी छोट्या सराफी व्यावसायिकांना व्यवसाय करताना कमालीचा धोका पत्करावा लागत आहे. चढय़ाभावाने खरेदी करूनही कमी भावात विक्री होत असल्याने यामधील व्यवहारीक गणित साधत ग्राहकांची मागणी पूर्ण केली जात असल्याने बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

जळगावातील लहान व मोठय़ा व्यावसायिकांकडून दैनंदिन विक्रीच्या हिशेबाने सोने-चांदी मुंबई किंवा अहमदाबाद येथून खरेदी केले जाते. बुकिंग केल्याच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी किंवा तिसर्‍या दिवशी सोने व्यावसायिकांच्या हाती पडते. या तीन दिवसात भावात घसरण झाली असल्यास मार्केटमध्ये आजचा भाव असेल त्याच भावाने विक्री करणे भाग असते. अशाही परिस्थितीत तूट व काही प्रमाणात नुकसानही सहन करीत येणार्‍या ग्राहकांना सोने-चांदीची विक्री सुरळीतपणे केली जात आहे.

गुंतवणूकदार झाले सावध

लग्नकार्य किंवा अन्य मंगलकार्यासाठी सोने-चांदी खरेदी करणारे भावासाठी थांबून राहत नाही. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणारे दरातील घसरण आणि 25 हजारांपर्यंत भाव कमी होण्याची वाट पाहत सावध भूमिका घेऊन आहेत. त्यामुळे भावात घसरण होऊनही सराफ दुकानांमध्ये गर्दी होण्याऐवजी ती कमी झाल्याचे चित्र आहे.
सराफांचे असे होतात व्यवहार
जळगाव शहर किंवा जिल्ह्यातील मध्यम व लहान व्यापार्‍यांची सोने खरेदी दलालांच्या माध्यमातून होत असते. सोने किंवा चांदीचे दर सकाळी 11 वाजता उघड होतात. या वेळी चालू असलेल्या भावानुसार मागणी नोंदवली जाऊन पैसे संबंधित एजंटच्या खात्यात जमा केले जातात. त्याच्याकडून खरेदी केलेले सोने दुसर्‍या दिवशी किंवा तिसर्‍या दिवशी हातात पडते. बुकिंग केलेल्या दिवसाचा भाव 30 हजार रुपये तोळे असेल अन् सोने हातात पडेपर्यंत तीन दिवसानंतर भाव 28 हजार रुपये झाला. तर त्याला ग्राहकाला 28 हजारांच्याच भावाने सोने विक्री करणे भाग असते. अशा वेळी त्या दिवशी व्यावसायिक 28 हजारांच्या भावाने सोने बुकिंग करतात आणि दिवसभर पदरचे सोने विक्री करतात. अशा चक्रात काही प्रमाणात नुकसान होत असले तरी विश्वासार्हता जोपासण्यासाठी व्यवहार सुरुच ठेवले जातात. भाव वाढ होईल तेव्हा कमी भावात खरेदी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून नुकसानही भरून निघत असते.

व्यापार्‍यांकडे सोने-चांदीचा तुटवडा नाही
भावात कितीही चढ-उतार होत असला तरी आमच्या जळगावसह नाशिक, औरंगाबाद येथील शाखांमध्ये येणार्‍या ग्राहकाला हवे ते दागिने, सोने-चांदीत उपलब्ध करून दिले जाते. सुनील बाफना, संचालक आर सी बाफना ज्वेलर्स

सहा महिने तरी सोन्याच्या भावात चढ-उतार सुरू राहण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाचे कौशल्य पणाला लागत आहे. धोका पत्करूनच सर्व व्यावसायिक व्यवहार करीत आहेत. गौतम लुणिया, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन