आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Market Rate Issue At Jalgaon , Divya Marathi

सोन्याचे दर प्रचंड घसरले तरीही ग्राहकांचा खरेदीस थंड प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या महिनाभरापासून सोने दरात सुरू असलेली घसरण अद्यापही सावरलेली नाही. जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 28 हजार रुपये प्रती 10 ग्रॅम होता. मे महिन्याच्या प्रारंभी असलेल्या सोन्याच्या दराशी तुलना केली असता दरात सुमारे 2650 रुपयांनी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वधारलेले रुपयाचे मूल्य आणि स्थिर सरकार या बाबींमुळे सोन्याचे भाव उतरल्याचे मत सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. तरीही बाजारात ग्राहक वर्गाचा खरेदीस थंड प्रतिसाद आहे.
शहरात कोणत्याही शोरूममध्ये फारशी वर्दळ दिसत नाही. सोने मोडीसाठी येणार्‍यांच्या प्रमाणातही घट झाली आहे. काही प्रमाणात गरजू व्यक्ती दुकानात फिरकत आहेत. लग्न समारंभाची प्रासंगिक खरेदी गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. मात्र, आता लग्नसराई संपत आल्याने त्यांची संख्या सुद्धा रोडावली आहे. किरकोळ नियमित ग्राहक वगळता फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सराफ बाजारातील व्यावसायिकांनी दिली. सतत कमी होणार्‍या दरामुळे ग्राहकांनी खरेदी न करण्याची भूमिका घेतलेली दिसत आहे.
भाव वाढताना खरेदी जास्त
सोने बाजारात भाव उतरत असताना होणार्‍या खरेदीपेक्षा भाव वधारत असताना ग्राहकांची संख्या वाढते. दर कमी होत असतील तर आणखी कमी होण्याची वाट ग्राहक बघत असल्याने सध्या बाजारात व्यवहार थंडच असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. तसेच भाव स्थिर असतानाही ग्राहक संख्या चांगली असते.
का कमी झाले भाव
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या डॉलरची किंमत 69 वरून 59 रुपयांवर आली आहे. त्यामुळे बाजारात रुपया मजबूत होत आहे. तसेच बर्‍याच वर्षांनंतर एकाच पक्षाला बहुमतात इतक्या जागा मिळाल्याने आता सरकार स्थिर असेल. यामुळेही भावात फरक पडला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.