आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे भाव आठवडाभरात एक हजार रुपयांनी घसरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे मूल्य घटल्याने त्याचा परिणाम विविध घटकांवर झाला आहे. सोन्याचे प्रतितोळ्याचे दर २७ हजार १०० रुपयांवरून थेट २६ हजार १०० रुपयांवर आले आहेत. दरात एक हजाराची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

काही वर्षांपासून बहुतांश पतसंस्था डबघाईस गेल्याने नागरिकांनी सोन्यासह जमिनीत गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातही आता जमिनीचे दर प्रचंड वाढल्याने अनेक जण फक्त सोन्यामध्येच गुंतवणूक करत असल्याची स्थिती आहे. तसेच लग्नसमारंभांसाठीही सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. त्यामुळे सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले होते. परंतु, वर्षभरापासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने सराफ बाजारात कायम तेजी-मंदीचे वातावरण आहे. सोन्यातून मिळणारा परतावा थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यातच आता पुन्हा पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारावरही िदसू लागला आहे. त्याचबरोबर आता कुंभमेळा सुरू झाल्याने लग्न मुहूर्तही नाहीत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी पूर्णपणे थांबली आहे.
दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण झाल्याने गुरुपुष्यामृतामुळे गुरुवारी सोने खरेदीसाठी बऱ्यापैकी गर्दी झाली होती. काही दिवसांपूवी प्रतितोळे २७ हजार १०० रुपये असलेले सोने मध्यंतरी २७ हजार ८०० रुपयांपर्यंत गेले होते. आता पुन्हा भावात घसरण झाल्याने सोन्याची २६ हजार १०० रुपये प्रतितोळा दराने विक्री होत आहे. चार महिन्यांपूर्वीही २६ हजार ६०० रुपये दर होते, अशी माहिती सराफांनी दिली.

ग्राहक घेऊ शकतात फायदा
सोन्याचेदर कमी झाल्याने ग्राहक या संधीचा फायदा घेऊ शकतात, अशी शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सराफ बाजाराचा अभ्यास केल्यास सोन्याचे दर वाढल्यावर अनेक जण केवळ गरजेपुरतीच सोने खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसते. या काळात सोने मोडणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढते. त्यामुळे आता सोन्याचे दर कमी झाल्याने किती ग्राहक या संधीचा फायदा घेतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दसरा-दिवाळीत भाववाढ होण्याची शक्यता
लग्नकार्यअधिक मास संपल्याने सोने बाजारातील व्यवहार मंदावले असून, सोने खरेदी नेहमीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, दसरा-दिवाळीत सोने बाजारात पुन्हा उलाढाल वाढेल. त्याच वेळी भाव वाढण्याची शक्यता आहे. -अजयनाशिककर, नाशिककर ज्वेलर्स, धुळे
बातम्या आणखी आहेत...