आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने ३३ हजार ५०० रुपये तोळा; २४ कॅरेटचा तुकडा विक्री बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ५००-१००० च्या नोटा बंद करण्याच्या घोषणेचे तीव्र पडसाद बुधवारी सुवर्णनगरीतील सराफा बाजारात उमटले. एका रात्रीत सोने तोळ्यामागे १६०० रुपयांनी वाढले. मात्र, बाजार थंडावला होता. एरवी सराफा बाजारात सकाळपासून गर्दी असते. मात्र, बुधवारी बाजार एकदम थंडावला होता. मुंबईत आणि कमोडिटी मार्केटमध्ये सोने भावात चढ-उतार असल्याने अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बाजारात संभ्रमाचे वातावरण होते. सराफा व्यापाऱ्यांनी केवळ १०० अथवा त्याखालील नोटांमध्येच व्यवहार सुरू ठेवल्यामुळे उलाढालही कमी होती. एकमुस्त सोने खरेदीसाठी सराफ व्यापाऱ्यांचे फोन खणाणत होते. मात्र, ५००-१०००च्या नोटा स्वीकारण्यास नकार िदल्याने अनेक मोठ्या ग्राहकांची पंचाईत झाली.
५००-२०००च्या नव्या नोटा दाखल!
जळगाव ५००,एक हजाराची नोट बंद केल्याच्या घोषणेनंतर संभ्रमाची परिस्थिती असताना नागरिकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. जळगाव शहर जिल्ह्यात २००० आणि ५००च्या नव्या नोटा दाखल झाल्या असून, गुरुवारपासून बँकांमध्ये नोटा स्वीकारण्यास आणि बदलून देण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील बँकांमध्ये एकूण रकमेपैकी ४५ टक्के नोटा १०० रुपये आणि ५० रुपयांच्या असल्यामुळे नोटांचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली आहे. दरम्यान, बुधवारी शहरात गोंधळाची परिस्थिती होती. सुट्या पैशांच्या शोधात नागरिकांना उन्हातान्हात वणवण फिरावे लागत होते. ५००, १०००च्या नोटा खपवण्यासाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडाली, तर रेल्वेस्थानक, बसस्थानक, खासगी रुग्णालये, मेडिकल स्टोअर्सवर नोटांवरून वादावादी सुरू होती, तर सुवर्णनगरी म्हणून विख्यात असलेल्या जळगावातील सराफ बाजारात मात्र व्यवहार पूर्णपणे थंडावले होते.
सुट्या पैशांअभावी प्रवासी, ग्राहकांची गैरसोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांकडून याचे स्वागत होत आहे. मात्र, बुधवारी सकाळपासून दूध, भाजीपाल्यासह रेल्वे, एसटी प्रवासाचे तिकीट खरेदी करताना सुट्या पैशांअभावी नागरिकांची गैरसोय होताना दिसली. त्यामुळे दिवसभर वस्तू खरेदी करताना सुट्यापैशांवरून वादविवाद तर कुठे हजार, पाचशेच्या नोटा बंदची चर्चा रंगली. रेेल्वेचे तिकीट घेण्यासाठी बहुतांश प्रवासी पाचशे हजार रुपयांच्या नोटांचा वापर करीत होते. प्रामुख्याने ३० रुपयांपासून दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत तिकीट घेणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना उर्वरित सुटे पैसे देणे शक्य होत नसल्याने तिकीट खिडकीवर गोंधळ उडाला. अशीच परिस्थिती एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत ठिकठिकाणी घडली. यामुळे सुटे पैसे नसल्यामुळे वाहकांशी वाद घालण्याची वेळ आली. १० ते २० रुपयांच्या तिकिटासाठी पाचशे रुपयांची नोट वाहकांना प्रवासी देत होते. मात्र, वाहक प्रवाशांकडे सुटे पैशांची मागणी करीत होते.

सर्व बँकांना चार अतिरिक्त कक्ष सुरू करण्याचे आदेश
सुट्या पैशांची चणचण नागरिकांची वणवण
एसटी, रेल्वेस्थानक, पेट्रोल पंपांवर नोटांवरून वाद
वैतागलेल्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांचा जाच
सोने उजळले पण सराफा बाजारात व्यवहार थंडावला

दोन दिवसांमध्ये व्यवहार सुरळीत
जिल्ह्यातील सर्व बॅंकांमध्ये असलेल्या एकूण रकमेपैकी ४५ टक्के नोटा शंभर पन्नास रुपयांच्या आहेत. त्यामुळे नागरिकांना या नोटांचा तुटवडा भासणार नाही. पाचशे हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. आगामी एक-दोन दिवसांमध्ये सर्वांना पाचशे हजार रुपयांच्या नाेटा बदलून मिळतील. छापण्यात आलेल्या दोन हजार पाचशे रुपयांच्या नोटाही जिल्ह्यातील काही बॅंकांमध्ये दाखल झाल्या आहेत. नागरिकांच्या सोईसाठी सर्व बंॅकांना चार अतिरिक्त कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी बंॅकमित्रांची मदत घेण्यात येणार आहे. गुरुवारपासून बंॅका सुरू होणार आहेत. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही बंॅका सुरू ठेवण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. ज्यांनी अद्याप बंॅकेत खाते उघडलेले नाही, त्यांना आधार कार्डची झेरॉक्स देऊन प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खाते उघडून पैसे जमा करता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बँकांच्या सुट्या रद्द
गुरुवारपासून बँक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मंजूर सुट्या प्रशिक्षण रद्द करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची मदतही घेण्यात येणार असून नियोजित वेळेपेक्षा कामाचे तास वाढवण्यचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व बँका वेळेत उघडतील. मात्र, कामकाज उशिरापर्यंत चालणार आहे.


सुट्या पैशांअभावी गॅस सिलिंडर परत गेले
चलनातून ५०० १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे बुधवारी व्यवहारांना अनेक अडचणी अाल्या. यात घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना महिलांचा रोष सहन करावा लागला. प्रत्येक घरात हिच परिस्थिती असल्यामुळे अखेर अनेक कर्मचाऱ्यांनी सिलिंडरची डिलेव्हरी देणेच थांबवले होते. काही ठिकाणी किरकोळ वादही झाले. त्यामुळे सिलिंडर परत न्यावे लागले.

न्यायालयातही नोटांना नकार
न्यायालयात दैनंदिन कामकाजादरम्यान, पक्षकारांना दंड भरण्याची वेळ येते. बुधवारीसुद्धा एका पक्षकाराला एक हजार रुपयांचा दंड भरण्याची वेळ आली. त्या वेळी ५०० च्या नोटा नाकारण्यात आल्या. हा अनुभव पक्षकार वकिलांनी ‘दिव्य मराठी’शी शेअर केला.

बाहेरगावच्या प्रवाशांचे बुधवारी हाल झाले.हाॅटेलवर जेवण करण्यासाठी जाणाऱ्यांच्या खिशात ५०० रुपयांच्या नाेटांचे बंडल असूनही साधा चहासुद्धा हाॅटेलवाले देत नसल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले. बाहेरगावाहून अालेल्या प्रवाशांचे मंगळवारी रात्रीपासूनच हाल झाले. प्रवाशांना हाॅटेलमध्ये जेवण्याशिवाय पर्याय नसताे. मात्र, मंगळवारी अचानक नाेट रद्दच्या निर्णयामुळे त्यांची चांगलीच गैरसोय झाली. रेल्वेस्थानकातून बाहेर अालेल्या प्रवाशांना लाॅज तर साेडाच, जेवणही नशीब हाेत नव्हते.
शासनाने ५०० १००० रूपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने एका दिवसात सोन्याचे भाव ३१ हजार ४०० रूपयांवरून ३३ हजार ५०० रूपयांवर पोहोचले आहे. सोन्याचे भाव वाढण्यास हे एकमेव कारण आहे. त्याचा विपरित परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झाला आहे. ग्राहक ५०० १००० रूपयांच्या नोटा घेवून सोने-चांदी खरेदीसाठी येत होते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांनी सोने-चांदीचे व्यवहार केले नाही. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या नोटा रद्दच्या निर्णयामुळे सुवर्णनगरीला बुधवारी सुमारे एक कोटी रूपयांचा फटका बसला आहे, असे सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...