आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातून जप्त केलेले 58 किलो सोने कोशागार कार्यालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मुंबईकडे गुपचूप नेण्यात येणारे 58 किलो 900 ग्रॅम सोने निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने रविवारी संशयावरून जप्त केले होते. हे सोने कोशागार कार्यालयात जमा करण्यात आले. याप्रकरणी आयकर विभागाने तपास सुरू केला आहे. नाशिकचे सहायक कर आयुक्त अमोल खैरनार यांचे पथक याची चौकशी करणार आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून सोने नेले जात असल्याची माहिती मिळाल्याने निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने तालुक्यातील सोनगीर येथे ते जप्त केले होते. ते 16 कोटी 87 लाख रुपयांचे आहे. याप्रकरणी प्रशासनाने तत्परता दाखवत चौकशीला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग व आयकर विभागाचे पथक रात्री उशिरापर्यंत सोनगीरला तळ ठोकून होते. त्यानंतर मध्यरात्री गुप्तता पाळत सर्व सोने धुळे कोशागार कार्यालयात हलवण्यात आले. याप्रकरणी धुळे आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. नाशिक येथील आयकर विभागाचे सहायक कर आयुक्त अमोल खैरनार हे आता कागदपत्रांची चौकशी करणार आहेत.

या चौकशीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती धुळे आयकर विभागाने दिली. या प्रकरणावर आयकर विभागाचे मुंबईस्थित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. धुळे कार्यालयात आतापर्यंत झालेल्या चौकशी अहवालाच्या प्रती त्यांच्यापर्यंत विभागीय कार्यालयामार्फत पोहोचविण्यात आल्या आहेत. तपासात पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभल्याची माहिती धुळे आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.