आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामांनाही धान्याची प्रतीक्षा; शेतकरी, व्यापार्‍यांनी फिरवली पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शेतकरी आणि व्यापार्‍यांना धान्याची साठवणूक करणे सोयीचे व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळाने शहरात तीन गोदामांची निर्मिती केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या गोदामांकडे शेतकरी आणि व्यापार्‍यांनी पाठ फिरवली आहे.

रेल्वेचे जंक्शन आणि महामार्गामुळे दळणवळणाची पुरेशी साधने उपलब्ध असलेल्या भुसावळात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने तीन गोदामे बांधली. खाचणे हॉल परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर या गोदामांचे बांधकाम झाले आहे. शहर आणि परिसरातील शेतकरी व व्यापारी त्यांचे गहू, ज्वारी, बाजरी आदी धान्य अल्पदरात या गोदामात साठवू शकतात. गोदामांमध्ये साठवणूक केलेल्या धान्याचा सुरक्षेच्यादृष्टीने विमा काढला जातो. मात्र, शहराचा वाढलेला विस्तार आणि व्यापारी वर्गाने स्वत:ची गोदामे तयार करण्यावर भर दिल्याने वखार महामंडळाच्या गोदामांचा वापर थांबला आहे. ज्वारी, बाजरीचे क्षेत्र घटल्यानेही परिणाम झाले. विशेष म्हणजे राज्य वखार महामंडळाची गोदामे शहराच्या मध्यवर्ती भागात आल्याने धान्याने भरलेल्या अवजड वाहनांना रहदारीतून मार्गक्रमण करणे अडचणीचे होते. याचा वखार महामंडळाच्या उत्त्पन्नावर परिणाम झाला आहे.

आता तर मनधरणी करावी लागते
वखार महामंडळाकडून दरवर्षी उत्पन्न मिळावे, यासाठी धान्य साठवणुकीचे उद्दिष्ट दिले जाते. मागील वर्षी 10 तर यंदा 12 लाख रूपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी व्यापारी, शेतकरी वर्गाची मनधरणी करावी लागते.
- ए.आर.खाचणे, साठा अधीक्षक, भुसावळ

असे आहेत धान्य ठेवण्याचे दर
गोदामांमध्ये सुरक्षित धान्य साठवणुकीसाठी 50 किलोपर्यंतच्या 51 पोत्यांसाठी 6 रूपये 60 पैसे, 51 ते 100 पर्यंत 6 रूपये 40 पैसे, 100 च्यावर असलेल्या पोत्यांसाठी 6 रूपये 10 पैसे दराची आकारणी केली जाते. गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आलेल्या धान्याच्या सुरक्षिततेसाठी वखार महामंडळाने 24 तास तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, तरीही व्यापार्‍यांनी पाठ फिरवली आहे.