आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Hospital Ladies Doctor Issue In Ambalner

तज्ज्ञांअभावी रुग्णांना भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - स्त्रीरोगतज्ज्ञांअभावी येथील ग्रामीण रुग्णालयात केवळ सामान्य स्वरूपाची प्रसूती होते. महिलांना सिझेरियन व किचकट प्रसूतीसाठी खासगी दवाखान्यांच्या वाटेवर जावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

अपघात विभाग तर अस्थिरोगतज्ज्ञाअभावी जीवघेणा ठरला असून रुग्णांना धुळे जिल्हा रुग्णालयात अथवा इतर खासगी ठिकाणी रवाना करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात केवळ जुजबी औषधोपचाराचेच काम सुरू आहे.

महिलांना सिझेरियन अथवा इतर बाबींसाठी इतरत्र हलविण्यात आले आहे. शासनाने मोठे टोलेजंग रुग्णालय दिले आहे. मात्र, त्यात वैद्यकीय अधिका-यांची कमतरता आहे. शहर व तालुका नजरेसमोर ठेऊन तत्काळ सुविधा प्राप्त व्हावी, यासाठी उभारण्यात आलेली हे रुग्णालये केवळ प्रथमोपचार व वैद्यकांच्या अभावाने बेजार झाली आहेत.

सिझेरियन महागडेच : एका महिलेच्या सिझेरियनसाठी म्हटले तर 20 हजार रुपयांचा सरासरी खर्च अपेक्षित असतो. यासाठी लागणारी औषधे, पलंग ते इतर चार्जेस पाहता सामान्यांना परवडणारी ही बाब नाही.
अशी आहे पसंती : सामान्य प्रसूती झालेल्या महिलेचे बाळ व सिझेरियन झालेल्या बाळात फरक पाहता सिझेरियनचे बाळ बुद्धिमान असल्याची समजूत जनतेची झाली आहे. ज्या वेळी सामान्य प्रसूती होते, त्या वेळी बाळाचे डोके दाबले जाते व त्यात त्यांचा बुध्यांक कमी होतो, असा समज अनेक लोकांमध्ये आहे.

जीव गमवण्याची येते वेळ तालुक्यात कुठेही अपघात झाला तर त्याला धुळे येथे हलविण्याशिवाय पर्यायच नसतो. केवळ 45 कि.मी.वर असलेले धुळे ग्रामीण रुग्णालय अनेकांना जीवनदायी ठरले आहे. पण अनेक अतिगंभीर रुग्णांना वेळेअभावी उपचार न मिळाल्याने त्यांना दवाखान्याच्या वाटेतच प्राणही गमवावे लागले आहेत.
- रुग्णालयात दोन तज्ज्ञांचा अभाव आहे. आमच्या परीने आम्ही जेवढा उपचार होईल तेवढा करतो. एखाद्याचा जीव वाचत असल्याचे आम्हाला समाधान असते. परंतु अस्थिरोगतज्ज्ञाअभावी वेळेवर उपचार न झाल्याने जे रुग्ण जीवानिशी जातात, याबाबीचे दु:ख आम्हालाही आहे.
डॉ. जी.एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय