आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय गोदामे रिकामीच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहर व परिसरातील शेतक-यांना उत्पादित धान्य सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने भुसावळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर करारानुसार तीन मोठे गोदाम बांधले आहेत. मात्र, शेतकरी या गोदामांचा लाभ घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
ज्वारी, मका, बाजरी, दादर किंवा अन्य कृषीमालची साठवणूक शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यास शेतक-यांना चांगला भाव मिळण्याच्या कालावधित कृषीमालाची विक्री करणे शक्य आहे. अशा साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यात ठिकठिकाणी अल्पश: भाडेतत्त्वावर शासकीय गोदामे बांधली आहेत. या गोदामात ठेवण्यात येणा-या धान्यावर औषध फवारणी, धुरीकरण करण्यात येते. विम्याची व्यवस्था असल्याने नुकसान होण्याची शक्यता कमीच असते. तसेच धान्य व्यापा-यांना सुद्धा या शासकीय गोदामांचा लाभ घेता येतो.
शेतक-यांना गोदामात साठवून ठेवलेल्या धान्यावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, हंगाम येताच आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी धान्याची गोदामात साठवणूक व ज्यादा भावाची प्रतीक्षा न मिळेल त्या बाजारभावात धान्य विकून मोकळा होतो. व्यापारी सुद्धा शासकीय गोदामाच्या फंद्यात न पडता स्वत:च तशी व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य देतात. परिणामी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले गोदाम केवळ शोभेच्या इमारती बनल्या आहेत.
उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार - परिसरातील एकमेव केंद्र म्हणून भुसावळातील वखार महामंडळाच्या तिन्ही गोदामात 2010 मध्ये सर्वाधिक कापसाच्या गाठी अत्यंत सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या. पुणे महामंडळाच्या विभागाकडून या केंद्राला उत्कृष्ट वखार केंद्राचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. आता मात्र शेतकरी, व्यापारी या केंद्राकडे फिरके नासे झाले आहेत. गोदामामध्ये धान्य साठवणुकीसाठी एक क्विंटल धान्याला सहा रुपये दहा पैसे दर आकारणी होते. कमी जास्त प्रमाणात धान्य साठवणूक केल्यास 10 ते 15 पैशांचा फरक पडतो. तरीही भुसावळ शहर आणि परिसरातील शेतकरी या गोदामांमध्ये धान्यसाठा ठेवायला तयार नाहीत. यासाठी कृषी विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती केलेली नाही. त्यामुळे बहुतांश शेतक-यांपर्यंत ही योजना नेमकी काय आहे, तिचा वापर कसा करता येईल, याची माहितीच उपलब्ध नाही.
खराब रस्त्यामुळे अडचण - कापसाच्या गाठीची ट्रकद्वारे गोदामात वाहतूक करण्यात येते. या गोदामाकडे जाणारा रस्ता उंच-सखल व ओबडधोबड आहे. परिसरातील वीजतारा खाली येवून लोंबकळत आहेत. या तारांचा ट्रकला स्पर्श होवून दुर्घटना होवू शकते. टिंबर मार्केट परिसर असल्याने लाकडाची वाहतूक करणारी अवजड वाहने कायम ये-जा करतात. त्यामुळे वखार महामंडळाच्या गोदामात माल साठवणुकीला नेणे म्हणजे दिव्य पार करण्यासारखा प्रकार आहे. पालिकेने टिंबर मार्केटमध्ये रहदारीच्या रस्त्यांवर आणि ठरवून दिलेल्या प्लॉटच्या बाहेर लाकडे ठेवणा-यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, व्यापारी कोणालाही जुमानायला तयार नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवजड आणि आकाराने मोठी वाहने आणताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते.
कर्जाची सुविधा - शेतक-यांनी गोदामात धान्य साठवणूक केल्यास त्यावर कर्ज उपलब्ध होते. मात्र, शेतकरी याचा फायदा घेताना दिसत नाही. साठविलेल्या धान्याची काळजी घेण्यासाठी आम्ही शास्त्रीय पद्धतीने पुरेपुर प्रयत्न करतो. विशेष आगीसारख्या दुर्घटनेला टाळण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार असते. एखाद्या शेतक-याने गोदामात धान्यसाठा ठेवल्यास आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यास विमा संरक्षण मिळते. तालुक्यातील शेतक-यांनी या योजनेचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, असे महामंडळाचे तालुक्यातील शेतक-यांना आवाहन आहे. - ए.आर.खाचणे, कनिष्ठ साठा अधीक्षक, भुसावळ