आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्य वाहतूक गाड्यांना बसणार जीपीआरएस सिस्टिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-अन्नसुरक्षा योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि पुरवठय़ासंदर्भातील गैरप्रकार, धान्याचा अपहार यांना आळा घालण्यासाठी एसएमएसपाठोपाठ आता धान्याचा पुरवठा करणार्‍या गाड्यांवरही प्रशासनाची नजर राहणार आहे. वाहतूक करणार्‍या गाड्यांवर जीपीआरएस सिस्टिम लावून यंत्रणेकडून त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे. येत्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू होणार आहे.
जिल्ह्यात दर महिन्याला रेशन दुकानांवर 16 हजार मेट्रीक टन धान्याचा पुरवठा केला जातो. जळगाव शहरातील एफसीआय गोडाऊनमधून हे धान्य तालुक्याला तर तालुक्यावरून गावांमध्ये पुरवले जाते. दरम्यानच्या प्रवासात मोठय़ा प्रमाणावर धान्याचा अपहार होण्याची भीती असते. अन्नसुरक्षा योजनेत 28 लाख लाभार्थी आहेत. या योजनेचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पुरवठा विभागाने धान्यपुरवठा करणार्‍या गाड्यांवर जीपीआरएस सिस्टिम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरवठा विभाग करणार नियंत्रण
गोडाऊनमधून धान्याची गाडी निघाल्यावर तिचा मार्ग, तालुक्याचे ठिकाण, गाडीचे वजन आदी बाबींची नोंद तेथे होते. जीपीआरएसमुळे गाडी केव्हा निघाली, पोहोचली? याची माहिती पुरवठा विभागात कळू शकणार आहे. या सिस्टिमचे नियंत्रण पुरवठा विभागात बसून करता येईल.
एसएमएस सिस्टिम
धान्याच्या गाडीबाबतची माहिती तहसीलदार ते गावपातळीवर कळण्यासाठी यापूर्वी पुरवठा विभागाकडून एसएमएस सिस्टिम सुरू करण्यात आली होती. ती सुरू असली तरी जीपीआरएस सिस्टिम सुरू करून पुरवठा यंत्रणेवर आणखी नियंत्रण आणले जाणार आहे. धान्यपुरवठा करणार्‍या 50 गाड्यांवर ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
पुढील आठवड्यात काही गाड्यांवर प्रायोगिक तत्त्वावर जीपीआरएस सिस्टिम बसवली जाईल. त्यानंतर हळूहळू सर्वच गाड्यांवर ही सिस्टिम लावण्यात येईल. विकास गजरे, जिल्हा पुरवठा अधिकारी