आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

551 ग्रामपंचायतींचे काम आंदोलनामुळे झाले ठप्प!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींचा व्यवहार ठप्प झाला आहे. दरम्यान ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विस्तार अधिका-यांना लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने काम सुरू ठेवण्याचे आदेश गटविकास अधिका-यांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतींना ग्रामसेवकांअभावी टाळे ठोकण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना ग्रामसेवकांनी असहकार पुकारल्याने ग्रामस्थ अडचणीत येत आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर ग्रामसेवकांअभावी येणा-या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवकांअभावी अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व गटविकास अधिका-यांना जिल्हा परिषद प्रशासनाने पत्र पाठविले आहे. तसेच या अडचणीच्या कालावधीत विस्तार अधिका-यांनी बीटनिहाय ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली असल्याने विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले तातडीने उपलब्ध व्हावेत म्हणून संग्राम कक्षातील ऑपरेटरला सूचना देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त निर्मलग्राम अभियान, स्वच्छता अभियानासारख्या मोहिमा थंडावू नयेत म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर काम करणा-या विषयतज्ज्ञांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शक्य त्या वेळेस ग्रामरोजगार सेवक, संग्राम कक्षाचे ऑपरेटर, अंगणवाडीसेविका, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांचे सहकार्य घेण्याचे आदेश सीईओंनी दिलेले आहेत.

कामांचा होणार खोळंबा
जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींमध्ये 420 ग्रामसेवक कार्यरत आहेत. त्यापैकी 386 ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. ग्रामसेवकच कामावर हजर नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मूळ दप्तर ग्रामसेवकांच्या ताब्यात असल्याने बहुतांश कामे खोळंबणार आहेत. रोजगार हमी योजनेची कामे थांबू नयेत, अशा सूचना दिलेल्या असल्यातरी ग्रामसेवकांअभावी ही कामे पुढे सरकणार नाहीत.

या आहेत मागण्या
ग्रामसेवकांच्या कामाचा ताण कमी करण्यात यावा, ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवकांची वेतन तफावत दूर करण्यात यावी, कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात या व अशा अन्य प्रलंबित मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व गटविकास अधिका-यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात विस्तार अधिकारी, आशा, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचा-यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. ग्रामस्थांना कोणतीही अडचण येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. अनिल लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी

संघटनेचा दबाव
34 कंत्राटी ग्रामसेवकांना काम बंद आंदोलनात सहभाग घेण्याचा अधिकार नसला तरी काही कंत्राटी ग्रामसेवकांनीही कामावर दांडी मारलेली आहे. ग्रामसेवक संघटनेने कंत्राटी ग्रामसेवकांना कामावर जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवकही गावावर जात नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे प्रशासन हे ग्रामसेवक कामावर हजर असल्याचे चित्र उभे करीत आहे. दरम्यान या सर्व आंदोलनाचा ऐन केन प्रकारे सामान्य नागरिकांना फटका बसणार असून महत्वाच्या कागदपत्रांसाठी अडचण होईल.