आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीला गफ्फार मलिक यांचा विरोध?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - पालकमंत्र्यांच्या प्रत्येक विधानाला ‘हां जी’ म्हणून संमती देणार्‍या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांना भाजपबरोबर जाण्याचा गुलाबराव देवकरांचा प्रस्ताव मात्र आवडलेला नाही. त्यांनी या प्रस्तावाला विरोध केल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यांनी अशी भूमिका घेतली तर विरोधकांची संभाव्य महाआघाडी तयार होण्याआधीच कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेश जैन यांच्या विरोधकांनी येत्या महापालिका निवडणुकीत जैन यांच्या गटाला पराभूत करण्यासाठी महाआघाडी करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यात तीन दिवसांपूर्वी शासकीय विर्शामगृहात चर्चा झाली. त्यानंतर महाआघाडीबाबत भाजपचे पर्याय खुले आहेत, असे खडसे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर अशा आघाडी निर्मितीच्या हालचालींना गती आली आहे. विविध नेते आपापसात या आघाडीबाबत शक्य-अशक्यता
पडताळून पाहत आहेत.

भाजपची साथ मान्य नाही- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांना मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाबरोबर जाणे रुचलेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्वबळावरच ही निवडणूक लढवावी, असा घोष त्यांनी सुरू केला आहे. या आघाडीसंदर्भात आपली पालकमंत्र्यांशी अजून काहीही चर्चा झालेली नाही, असे ते सांगत असले तरी भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जायला त्यांनी नकार दिल्याचे राष्ट्रवादीतील त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्याच मुद्यावर मलिक यांनी आमदार सुरेश जैन यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचे भाजपबरोबर जाणे हे मुस्लिम समाजातील विरोधी नेत्यांच्या हाती कोलीत देण्यासारखे होणार आहे. त्यामुळेच ते भाजपबरोबर जाऊ शकत नाहीत, असेही त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.

समाजवादी पक्षाची भीती-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने शहरात सुरू केलेल्या हालचाली मुस्लिम मतदारांना मोठय़ाप्रमाणात आकर्षित करू शकतील, अशी भीती सर्वच पक्षातील मुस्लिम नेत्यांना वाटते आहे. समाजवादी पक्षाला संधी मिळू द्यायची नसेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर जाणे योग्य होणार नाही, असेही हाजी गफ्फार मलिक यांना वाटत असावे, अशीही शक्यता आहे.

करीम सालारांकडे लक्ष-दरम्यान, सध्या आमदार सुरेश जैन यांचे खंदे सर्मथक असलेले करीम सालार हे लवकरच कॉँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे संकेत मिळू लागले आहेत. तसे झाले तर त्यांना पक्षात पदही मिळेल. राष्ट्रवादी कॉँग्रेस भाजपबरोबर गेला तर कॉंग्रेस पक्षाकडे मुस्लिम मतदारांना वळवणे सालार यांना अधिक सोपे जाईल, असा विचारही गफ्फार मलिक करीत असावे, अशी शक्यता आहे.


वरिष्ठच निर्णय घेतील
राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर जायचे की नाही, हा प्रश्‍नच अजून माझ्यासमोर आलेला नाही. खडसे आणि पालकमंत्री यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहित नाही. याबाबत माझे पालकमंत्र्यांशी अजून बोलणे व्हायचे आहे. त्यामुळे इतक्यात भूमिका मांडणे योग्य नाही. वरिष्ठच काय तो निर्णय घेतील. गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस