आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रीन टेररिस्ट’: बावस्करांचे वक्तव्य म्हणजे.. ‘उल्टा चोर कोतवाल को डॉँटे’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- दीपनगरात रविवारी निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे पर्यावरणविषयक ‘चातक नेट’ विशेषांकाचे प्रकाशन झाले. या समारंभाचे अध्यक्ष तथा वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी ‘पर्यावरणवाद्यांनी ग्रीन टेररिस्ट’ची भूमिका घेऊ नये’ अशी मुक्ताफळे उधळली. त्यांच्या या वक्तव्याचा जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
औद्योगिक विकासात पर्यावरणवाद्यांनी आतापर्यंत कधीही खोडा घातलेला नाही. तसेच अहिंसक पद्धतीने पर्यावरण संवर्धनाचा लढा उभारला आहे; मात्र मुख्य अभियंत्यासारख्या जबाबदार अधिकार्‍याने नि:स्वार्थ भावनेने कार्य करणार्‍या पर्यावरणप्रेमींना ‘ग्रीन टेररिस्ट’ची उपमा देणे निषेधार्ह आहे. त्यामुळे पालकमंत्री सावकारे यांच्या माध्यमातून थेट ऊर्जामंत्री अजित पवारांकडे बावस्करांची तक्रार करू. तसेच काळ्या फिती लावून निषेध नोंदवू, अशी माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली.
>प्रकल्पातील पर्यावरणीय कामे केवळ कागदोपत्री पूर्ण केली जातात. त्याविरोधात लढणार्‍या पर्यावरणप्रेमींची मोट बांधण्यात यश येत आहे; मात्र त्यांचा आवाज दडपण्यासाठी बावस्कर असे बोलले. त्याचा आम्ही धिक्कार करतो.
-प्रा.के.पी.चौधरी, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, फुलगाव, ता.भुसावळ
>पर्यावरणवादी म्हणजे विकासाला फाटा देणारे, अशी मानसिकता बावस्करांनी करून घेऊ नये. आपल्याकडे अजून ‘ग्रीन टेररिस्ट’ची संकल्पना रुजलेली नाही. तसे झाल्यास प्रकल्प चालणार नाही.
-अभय उजागरे, सदस्य, खान्देश नेचर कंझव्र्हेशन, जळगाव
जिल्हाधिकार्‍यांना भेटणार
एका जबाबदार अधिकार्‍याने केलेले हे वक्तव्य निषेधार्ह आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना भेटून कारवाईची मागणी करू. पर्यावरणप्रेमींनी आतंकवाद्यांसारखी कोणती कामे केली ? ते दाखवावे, असे खुले आव्हान आहे.
- राजेंद्र नन्नवरे, निमंत्रक, सातपुडा बचाव कृती समिती
पर्यावरण कामांकडे लक्ष द्या
बावस्करांनी पर्यावरणीय कामांकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच पर्यावरणविषयक कार्यक्रमात त्यांनी विषयाला अनुसरूनच बोलणे अपेक्षित होते; मात्र पर्यावरणवाद्यांवर घसरून त्यांनी उलट स्वत:चेच हसे करून घेतले आहे.
-निमजी जलगॉँववाला, सदस्य, सातपुडा बचाव कृती समिती, जळगाव
बावस्करांचा संयम सुटला
पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने प्रदूषणाबाबत आवाज उठवला जात असल्याने बावस्कर अडचणीत आले असावेत. त्यामुळे संयम सुटल्याने त्यांनी हे बेताल वक्तव्य केले आहे. आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो.
-सतीश कांबळे, सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था
उल्टा चोर कोतवाल को डॉँटे
सेवाभावी पर्यावरणप्रेमींना ‘ग्रीन टेररिस्ट’ संबोधणे निंदणीय आहे. बावस्कारांनी केलेले विधान म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डॉँटे’ या म्हणीचा प्रत्यय करून देते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
-सुरेंद्र चौधरी, सदस्य, भारतीय पर्यावरण व्यवस्थापन संघटना