आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोकेदुखी: भारनियमनात होणार वाढ; 10-10 तास शहर होरपळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील वसुली आणि वीज गळतीची आकडेवारी महावितरणने नव्या फॉरमॅटमध्ये मागितल्यानंतर क्रॉम्प्टनने आधी दिलेली सगळीच आकडेवारी बदलली आहे. त्यामुळे जळगावात भारनियमनमुक्ती अशक्य असल्याचे चित्र समोर आले असून अनेक भागात भारनियमन वाढण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या आकडेवारीमुळे क्राम्प्टनचे अधिकारी तणावात आले आहेत.

क्रॉम्प्टन कंपनीकडून आलेला भारनियमनमुक्तीचा चेंडू महावितरणच्या अधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे टोलवतांना क्रॉम्प्टनचे आधी मांडलेले वसूली आणि गळतीचे गणित खोटे ठरविले आहे. नव्या फॉरमॅटमध्ये आलेल्या आकडेवारीला सोमवारी महावितरणच्या अधिकार्‍यांनी मंजुरी दिली. अंतीम मंजुरीसाठी त्यांनी ती आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली. वरिष्ठांनी त्याला मान्यता दिली तर शहरातील मोजक्या भागात दीड ते तीन तासांइतके भारनियमन कमी होऊ शकेल. दर महिन्याला वसुली व गळतीच्या स्थितीनुसार ते बदलत राहणार असल्याचे क्रॉम्प्टनच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

‘दिव्य मराठी’ने शहरातील फीडरनिहाय स्थिती मांडत 65 टक्के जळगावकर भारनियमनमुक्तीला मुकत असल्याचे समोर आणले होते. याची दखल घेत क्रॉम्प्टन व महावितरण कंपनीने फीडरनिहाय प्रस्ताव तातडीने तयार करून तो वरिष्ठांकडे पाठविला आहे.

क्रॉम्पटनसाठी डोकेदुखी
क्रॉम्पटनने सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा करीत त्यात एकूण दहा फीडरवर भारनियमन त्याभागातील स्थिती नुसार कमी अधिक केले आहे. यात बहुतांश भागात भारनियमन कमी होण्याऐवजी वाढले आहे. या भागात वसुली कमी व गळतीचे प्रमाण अधिक आहे. यात जिल्हापेठसह स्वातंत्र्य चौक, टॉवर फीडर, गणपतीनगर, शारदा कॉलनी, शिवतीर्थ मैदान, विठ्ठलपेठ, बळीरामपेठ या भागातील फीडरवरील भारनियमन नेहमीपेक्षा अधिक होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या संतापातही वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा प्रस्ताव क्रॉम्प्टनची डोकेदुखी वाढणार असल्याची स्थिती आहे.

अशी असेल स्थिती
वसुली व गळतीच्या नव्या प्रस्तावानुसार शहरातील केवळ भवानी मंदिर (पिंप्राळा ) भागात भारनियमन तीन तासांनी कमी होणार आहे. काही ठिकाणी ते 1 ते दीड तासांनी कमी होईल. मात्र, शहरातील प्रगत भागातील नागरिकांना वाढत्या भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

मी स्वत:ही प्रयत्नशील
क्रॉम्प्टनकडून आज प्रस्ताव प्राप्त झाला. त्यावर आपली मान्यता देऊन तो महावितरण कार्यालयाकडे पाठविला आहे. तो आठ दिवसात मंजूर होणे अपेक्षित आहे. पुढील काही दिवस सुट्यांचे आहे. यामुळे काही दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. मी स्वत: याचा पाठपुरावा करून भारनियमनमुक्तीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण