आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेत वीजबिल न मिळाल्याने ग्राहकांना 10 रुपयांचा भुर्दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- वीज वितरण कंपनीच्या पायलट प्रोजेक्टनंतर शहरातील वीज बिलांच्या वाटपात घोळ निर्माण झाला आहे. मुदतीनंतर ग्राहकांच्या हातात वीजबिल मिळत असल्याने दरमहा 10 ते 20 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. शहरातील नसरवानजी फाइल भागातील नागरिकांना या महिन्याचे वीजबिलच न मिळाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

वीज वितरण कंपनीने शहरात पायलट प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टमुळे शहरातील दोन उपविभागांचे विलीनीकरण होऊन एकच उपविभागीय कार्यालयाची निर्मिती झाली. विविध विभागांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग तयार होऊन प्रत्येक विभागाची जबाबदारी एका कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. यामुळे कामाचे नियोजन होऊन सूसुत्रता आली. मात्र, याच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून वीजमीटरचे रीडिंग घेण्याचे काम कंत्राटदाराऐवजी कंपनीकडे आले. गेल्या चार महिन्यांपासून वीजबिले तयार करण्यापूर्वी रीडिंग घेणे, बिल तयार करून त्याचे वाटप, ही कामे कंपनीचे अधिकृत कर्मचारी करतात. यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याने वीजबिलांच्या रीडिंगपासून थेट वाटपापर्यंत गोंधळ निर्माण झाला आहे. वीजबिल मुदतीत मिळत नाहीत. मुदतीत भरण्याच्या शेवटच्या दिवशी बिल हातात मिळाल्याने ते दुसर्‍या दिवशी भरावे लागते. परिणामी 10 किंवा 20 रुपयांचा दंड भरावा लागतो. नसरवानजी फाइल भागात तर जानेवारीचे वीजबिल ग्राहकांना अजूनही मिळाले नाही. बुधवारी वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी या भागात पोहोचले. पथकाने वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिलच न मिळाल्याने पैसे भरणार कसे? या प्रश्नांचा भडीमार झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.

ग्राहकमंचात तक्रार करणार
मीटर फॉल्टी दाखवून 20 हजार रुपयांचे बिल हातात टेकवले. तत्कालीन उप कार्यकारी अभियंता डी.एस.धिवरे यांना हा प्रकार सांगितला होता. ही कंपनीची चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले होते. तरीही चूक दुरुस्त न झाल्याने ग्राहकमंचात तक्रार दाखल केली आहे.
-मयूर जोशी, सुरभीनगर, भुसावळ


वीजबिल अजून मिळाले नाही
नसरवानजी फाइल भागात ग्राहकांना वीजबिल मिळाले नाही. यामुळे बिल भरणार कसे? कंपनीचे कर्मचारी बुधवारी वीजपुरवठा तोडण्यासाठी आले, त्यांना हा प्रकार सांगूनही उपयोग झाला नाही. उपकार्यकारी अभियंता ए.एन.भारंबे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर कारवाई थांबविण्यात आली.
-मुन्नवर खान, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग

अडचण लवकरच दूर होईल
ग्राहकांना वेळेत वीजबिल देण्याचा प्रयत्न असतो. पायलट प्रोजेक्टमुळे कामांची जबाबदारी वाढली. सदोष पद्धतीने मीटर रीडिंग घेवून बिले दिली जातात. इन्फ्रारेड मीटरच्या रीडिंगसाठी उपकरणाची मागणी यापूर्वीच केली आहे. उपकरणे मिळाल्यावर तांत्रिक अडचण दूर होईल.
-ए.एन.भारंबे, उपकार्यकारी अभियंता, भुसावळ