आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guarantee Of Undivided Maharashtra Narendra Modi

अखंड महाराष्ट्राची हमी, ‘राज्यात देवेंद्र’ची दवंडी; नरेंद्र मोदींची नवी खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/धुळे / नागपूर - महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप महाराष्ट्राचे तुकडे करू पाहात असल्याच्या आरोपांना उत्तर देत मराठी अस्मितेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न खान्देशात केला आणि विदर्भात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत स्वतंत्र विदर्भवाद्यांचा रोषही शांत करण्याचा प्रयत्न केला.

मोदी महाराष्ट्राचे तुकडे पाडू पाहात आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करून गुजरातला जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप दिवसांपासून शिवसेना आणि अन्य विरोधकांकडून केला जात आहे. त्या आरोपांना मोदींनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील सभेत उत्तर दिले. मुंबई वेगळी केली जाईल. मुंबईला घेऊन जातील, अशा अफवा काही लोक पसरवत आहेत.मुंबईकडून कुणीही काही हिसकावून घेऊ शकत नाही. देशासाठी मुंबई व महाराष्ट्र महत्त्वाचा असून हे दोन्ही ठप्प झाले तर देश ठप्प होतो. असे मोदी म्हणाले. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी काही अजेंडा नसल्याने खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. अफझलखानाची फौज महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाजप मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र रचत असल्याची टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे स्पष्टीकरण दिले.

मोदी यांच्या अखंड महाराष्ट्राच्या वक्तव्याचा संदर्भ लगेच भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीशी जोडला गेला. मोदी हे स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात असल्याचा सूरही लावला जाऊ लागल्याने भाजपच्या विदर्भवादी नेत्यांनी लगेच स्पष्टीकरणही दिले. भाजपला पण छत्रपतींच्या महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत, या आरोपाचा शिवसेनेने पुनरूच्चार केला.

* मराठी अस्मितेवर फुंकर
महाराष्ट्राविना देश अधुरा
मी दिल्लीत असेपर्यंत कोणतीही शक्ती महाराष्ट्राचे तुकडे करू शकणार नाही. छत्रपती शिवरायांच्या या भूमीचे तुकडे पाडणारा अजून जन्माला आलेला नाही. मुंबईशिवाय महाराष्ट्र व महाराष्ट्राशिवाय भारत अधुरा आहे. (एरंडोलच्या सभेत)

* विदर्भवाद्यांना खूश केले
देवेंद्र ही अनमोल भेट
देवेंद्र फडणवीसांनी घोटाळे उघडकीस आणून सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. देवेंद्र ही नागपूरची महाराष्ट्राला अनमोल भेट आहे.महाराष्ट्राचा डंका वाजवण्यासाठी दीक्षाभूमीचा आशीर्वाद आणि साथ द्या. (नागपूरच्या सभेत)

गांधीजींनंतर आता नेहरू - इंदिरा गांधी ‘लक्ष्य’
मोदींनी काँग्रेसचे गांधी पळवल्याचा आरोप होत असतानाच नागपूरच्या सभेत मोदींनी नेहरू- इंदिरा हे पुढील ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत दिले. आपण राजकीय अस्पृश्यता पाळत नाही. १४ नोव्हेंबरला पंडित नेहरू व १९ नोव्हेंबरला इंदिरा गांधी जयंती आहे. या कालावधीत आपले सरकार शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्याचे धडे देऊन जयंती साजरी करेल, असे मोदी म्हणाले.

विदर्भवाद्यांची सारवासारव
वेगळ्या विदर्भाची आमची भूमिका कायम आहे. मोदींचे वक्तव्य मुंबई संदर्भात होते, छोट्या राज्यांचे भाजपने समर्थन केले असून मोदींनाही ती भूमिका माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष.

‘महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही,’ हे मोदींचे वक्तव्य मुंबई पुरते होते. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याने ती वेगळी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री.

पुढे वाचा ... उध्‍दव काय म्हणाले ?