आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रव्यवहारात अडकला गुड्ड्याच्या खुनाचा तपास, स्थानिक पोलिस-क्राइम ब्रांचची एकमेकांना पत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख याच्या खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपविण्यास जिल्हा पोलिस यंत्रणा तयार नाही. त्यातून पोलिस दल क्राइम ब्रांचमध्ये पत्रव्यवहारही सुरू झाला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या कार्यालयापर्यंत हा पत्रव्यहार झाला आहे.
 
धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगरमध्ये अनेक गुन्ह्यांचा धनी असलेल्या कुख्यात गुंड गुड्ड्याचा गत महिन्यात निर्घृणरीत्या खून झाला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चुकीचा संदेश जाऊ पाहत आहे. असे असले तरी धुळे पोलिसांकडून मात्र सखोल तपासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळेच मारेकरी त्यांना आश्रय देणाऱ्यांना गजाआड करण्यात आले आहे. या खुनाच्या तपासावरून आता मुंबई क्राइम ब्रांच आणि धुळे पोलिसांचा पत्रव्यवहार सुरू झाला आहे. मंत्रालयातील आदेशानुसार या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचला सोपवा असे पत्र राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या कार्यालयापर्यंत पाठविण्यात आले आहे.

तर दुसरीकडे गुन्ह्यातील १५ संशयितांना अटक केली आहे. हत्यार, वाहन तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या पसार असलेल्या संशयितांच्या मागे पोलिस आहेत. लवकरच ते गजाआड होणार असल्यामुळे या प्रकरणाचा तपास धुळे पोलिसांना करू द्यावा, यातून पोलिसांचे मनोधैर्यही अबाधित राहील. अशा आशयाचे पत्र धुळे पोलिसांनी महासंचालक माथूर यांच्या कार्यालयाला पाठवले आहे. असे असले तरी दोन्ही बाजूने तपास सुरू आहे. दरम्यान, दोघा विभागांकडून पत्रव्यवहार झाला असल्यामुळे याबाबत अंतिम निर्णय महासंचालक माथूर घेणार आहेत. लवकरच ही बाब स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
तडकाफडकी निरोप, कार जप्त
तपासाचीदिशा जाणून घेण्यासाठी गुरुवारी सकाळी नाशिक विभागीय विशेष पोलिस निरीक्षक कार्यालयातून तपास अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यानुसार डीवायएसपी हिंमत जाधव नाशिकला रवाना झाले आहेत. तसेच काल बुधवारी जाधव यांच्या पथकाने भुसावळमध्ये जाऊन तपास केला. या वेळी मारेकऱ्यांनी धुळ्यातून पसार होण्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
वरिष्ठांना इत्थंभूत माहिती
खुनाचा तपास प्रगतीवर आहे. त्यासाठी पथकही इतरत्र रवाना झाले आहेत. येत्या काही दिवसांत इतर संशयितही गजाआड होतील. राज्याचे पोलिस महासंचालकांना पत्र देऊन या प्रकरणाची इत्थंभूत माहिती दिली आहे. शिवाय तपास स्थानिक पोलिसांना करू द्यावा, असे त्यात नमूद केले आहे. तरीदेखील अंतिम निर्णय तेच घेतील.
- एम.रामकुमार, पोलिस अधीक्षक, धुळे.
बातम्या आणखी आहेत...