आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड्ड्याच्या खुनाचा तपास काढून घेण्यासाठी वरिष्ठांना पत्र, DYSP हिंमत जाधव यांच्या पत्राने खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील पारोळा रोडवर भरदिवसा कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख याच्या खुनाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओढून ताणून या प्रकरणात तिघांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राजकीय वर्तुळाचा गैरफायदा घेत थेट वरिष्ठांपर्यंत मागणी केली जात आहे. त्यामुळे तपास भरकटण्याचीही चिन्हे आहेत.
 
तसे होऊ नये म्हणून उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी आपल्याकडून तपास काढून घ्यावा, अशी विनंती वरिष्ठांना अर्जातून केल्याबाबत पोलिसांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे खून प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रकारही समोर येऊ पाहतो आहे. यातून राजकीय दबावतंत्र वाढत असल्याचे चित्र आहे. 
 
कुख्यात गुंड गुड्ड्याचा भरसकाळी निर्घृणरीत्या खून झाला होता. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लाेटला आहे. तर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मोक्कानुसार कारवाईही केली आहे. शिवाय खून प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्यासाठीही पडद्याआडून प्रयत्न होत आहेत. आपल्या इच्छेनुसार तपास व्हावा, या हेतूने पोलिस दलाच्या वरिष्ठांपर्यंत संपर्क साधला जात आहे. काहीही करा पण तिघांची नावे समाविष्ट करा, अशी अवास्तव मागणी होत आहे. थोडक्यात तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे. हे राजकीय दबावतंत्र केवळ धुळे पोलिसांवरच नाही तर सध्या तपास करत असलेल्या एसआयटीवरही येऊ पाहते आहे. त्यामुळे कायद्यानुरूप तपास होत असूनही हस्तक्षेप वाढतो आहे. यातून भविष्यात पोलिस दलाची प्रतिमा तर मलिन होईलच शिवाय तपासही भरकटू शकतो, अशी चर्चा आता पोलिस दलात सुरू आहे. शिवाय खासगीत बोलतानाही पोलिस याबाबत माहिती देतात. त्यामुळे आजवर केलेल्या तपासावर परिणाम नको आणि राजकीय दबाव तर मुळीच नको अशी भावना तपास अधिकारी यांच्यात आहे. त्यामुळेच उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांनी आपल्याकडील तपास काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे. शिवाय तसा अर्जही वरिष्ठांना सादर केला आहे, अशी माहिती पोलिस देतात. 
 
दरम्यान, मृत गुड्ड्या हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हता; परंतु आगामी निवडणुकीसाठी तो इच्छुक असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. मात्र त्यापूर्वीच पूर्ववैमनस्यातून गुड्ड्याचा खून करण्यात आला. हा धागा पकडून राजकीय लाभ घेण्याचा खटाटोप आता सुरू झाला आहे. दरम्यान अधिकारी जाधव यांनी दिलेल्या अर्जाबद्दल अधीक्षक एम. रामकुमार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका ही समजू शकली नाही. 
 
कोण आहेत चौघे 
गुन्ह्यातनाव गुंतविण्यात यावे यासाठी प्रयत्न होत असलेले तिघे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यापैकी तिघे या पक्षातील मातब्बर राजकारणी मानले जातात. एक माजी दोन विद्यमान एक लोकप्रतिनिधी असलेल्या या तिघांसाठीच हा खटाटोप सुरू असल्याची माहिती अधिकारी खासगीत बोलताना देतात. तर थेट वरिष्ठांपर्यंत मागणी करणारे राजकीय व्यक्ती विरोधी पक्षाचे आहेत. 
 
आठवड्यानंतरही तपास ढिम्म 
याखून प्रकरणी पोलिसांनी प्रकाश चौधरी याला अटक केली आहे. स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांचा भाऊ असलेल्या प्रकाशला अटक होऊन गुरुवारी आठवडा उलटला. शिवाय शनिवारी (दि. ७) त्याच्या पोलिस कोठडीची मुदतही संपते आहे; परंतु यानंतरही एसआयटीला इतरांची नावे समोर आणता आलेली नाहीत. त्यामुळे एसआयटीकडून आता लपवाछपवी सुरू झाली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...