जळगाव - नाव घेण्यासाठी महसूलमंत्री शांताबाई आहेत का? असे म्हणणाऱ्या आमदार गुलाबराव पाटलांनाही मी तमाशातील सोंगाड्या म्हणू शकतो. मात्र, आमची तशी संस्कृती नसल्याचा पलटवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांनी रविवारी केला. व्यक्तिद्वेषातून त्यांच्याकडून सतत आरोप होताहेत. माझ्याविषयी नाराजी असेल तर माझ्याशी खेटावे; एकनाथ खडसेंशी खेटण्याएवढी त्यांची उंचीही नसल्याचे टीकास्त्र पी.सी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोडले.
काही दिवसांपासून महसूलमंत्री खडसे गुलाबराव पाटलांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. खडसेंनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केल्यानंतर गुलाबरावांनीही तोंडसुख घेतले होते. यासंदर्भात पी. सी. पाटलांनी गुलाबरावांच्या प्रश्नांना उत्तर देत योजनांचा लाभ घेणे चुकीचे आहे का? कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही? हे दाखवा. आमदार पाटलांनीही पंचायत समिती सदस्य असताना जवाहर योजनेंतर्गत विहीर मंजूर करून घेतली होती; परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. रावेर तालुक्यातील अवैध धंद्यांवर बाेलतात; मग पाळधीत काय सुरू आहे? बांभोरी तर ‘मिनी बिहार’ झाले आहे. दारूबंदीसाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. गुलाबराव पाटलांचे पाळधीत बिअर बार असून, त्यांना त्याचे परमिट मिळालेय. तसेच जिनिंगची परवानगीही मिळाली. मात्र, त्याबाबत आम्ही काहीही बोललो नाहीत. म्हसावद येथे मयताची खोटी सही करून गुलाबराव पाटलांनी शाळा हडप केल्याचा आरोपही पी.सी.पाटलांनी केला. त्यांनी अवैध धंदे बंद करून दाखवावे; अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
वाघळूद सोनवद पाणीपुरवठा योजनेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यात न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. जर त्यात कोणी दोषी आढळले तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, या मताचे आम्हीदेखील असल्याचे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अशोक लाडवंजारी, नगरसेवक सुनील माळी आदी उपस्थित होते.
पुढे वाचा.. मंत्रिपदासाठी त्यांना भाजपच्या शुभेच्छा