आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर देवकरांनी ध्वजवंदन केलेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सर्वत्र उत्सुकता लागून असलेले स्वातंत्र्य दिनाचे शासकीय ध्वजवंदन अखेर पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीच केले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे व वारंवार देवकरांची नैतिकता पुढे करत आलेल्या ध्वजवंदनाच्या मुद्यावरून यंत्रणेत प्रचंड अस्वस्थता होती. त्यामुळे विरोधकांचा धसका घेत पोलिसांनी कधी नव्हे एवढा प्रचंड बंदोबस्त लावून रस्ते बंद केले होते. तथापि, अवघ्या पाच मिनिटांत पालकमंत्र्यांनी ध्वज फडकावून विरोधकांची मागणी धुडकावून लावली. दरम्यान, शिवसेनेच्या महिलांनी मात्र देवकरांच्या घरी जाऊन विरोध केला होता.
घरकुल घोटाळ्यातील आरोपी असल्याने पालकमंत्र्यांनी स्वत:हून ध्वजवंदन करू नये, याबाबत राज्यभर अनेक खलबते झाली. तसेच शिवसेना आणि भाजपनेदेखील राजकीय विरोध केला; मात्र या गोष्टींना फाटा देत अखेर पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजवंदन झाले. दरम्यान, सकाळपर्यंत काय होणार? आणि त्यानंतर ध्वजवंदनाचे काय झाले? या दोन प्रश्नांनी जळगावकरांना अक्षरश: पछाडले होते. देवकरांच्या अटकेइतकीच त्यांच्या हस्ते होणार्‍या ध्वजवंदनाबाबतची उत्सुकता टिकून होती. त्यामुळे आकाशवाणी चौक व स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या दोन्ही चौकांतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणारा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला होता. तसेच विरोधकांच्या संभाव्य आंदोलनाला मोडून काढण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. सकाळी 8.30 वाजेपूर्वीच पालकमंत्री देवकर जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात येऊन बसले होते. त्यानंतर निश्चिंत झालेल्या महसूल यंत्रणेने पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास ठेवून ध्वजवंदनाची तयारी सुरू केली. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व जिल्हा परिषद सीईओ शीतल उगले प्रत्यक्ष लक्ष घालून तयारीला लागले होते. त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षक एस.जयकुमार हे येणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
देवकरांनी केले ध्वजवंदन - पालकमंत्री कधी येणार? हा प्रश्नार्थक चेहरा घेऊन उपस्थित नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटकडे टक लावून बघत होते. ध्वजवंदनाची निर्धारित वेळ अवघ्या 5 मिनिटांवर येऊनदेखील देवकरांचा पत्ता नव्हता. अखेर 9 वाजून 6 मिनिटे होताच जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बसलेले पालकमंत्री आपल्या लाल दिव्याच्या गाडीतून ध्वजाजवळ पोहोचले. त्यानंतर खाली उतरून त्यांनी मानवंदना स्वीकारली व काही क्षणात ध्वजाची दोरी खेचली आणि नंतर राष्ट्रगीत झाले. त्यांनी नेहमीप्रमाणे काही प्रमुख पाहुण्यांच्या भेटी घेतल्या; मात्र लागलीच ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.
निदर्शने करणार्‍यांवर कारवाई - पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नंदनवन कॉलनीतील मधुबन या बंगल्यासमोर घोषणाबाजी व निदर्शने करून पालकमंत्र्यांनी ध्वजवंदन करू नये, अशी मागणी करणार्‍या महिला कार्यकर्त्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस अँक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. विनापरवानगी करण्यात आलेल्या या निदर्शनांप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्या शोभा चौधरी यांचेसह 39 महिला कार्यकर्त्यांविरुद्ध मुंबई पोलिस अँक्ट 67 प्रमाणे अटकेची कारवाई करण्यात येऊन 68 प्रमाणे त्यांची सुटका करण्यात आली.
जळगाव कन्स्ट्रक्शन आले मुळावर; मग गुलाबराव देवकर सह्याजीराव कसे?
घोटाळ्यावर घोटाळा : राज्यमंत्री देवकर पुन्हा अडचणीत