आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulabrao Devkar News In Marathi, Lok Sabha Election, Jalgaon Municipal Corporation

देवकरांच्या अनुपस्थितीत ‘फिल्डिंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभेच्या लढतीची समीकरणे महापालिका निवडणुकीतच जुळवण्याची माजी मंत्री गुलाबराव देवकरांची दूरदृष्टी त्यांच्या अनुयायांनीदेखील हेरली आहे. या दूरदृष्टीचा उपयोग करूनच अनेक जण जळगाव ग्रामीण मतदारसंघात स्वत:चे भवितव्य शोधत आहेत. त्या दिशेने पाऊल म्हणून येत्या विधानसभेची गणिते लोकसभेच्या आखाड्यात आखली जात आहेत. त्याला पक्षांतर्गत कलह आणि गटबाजीचे रूप दिले जात असले तरी, त्यामागील महत्त्वाकांक्षेचे राजकारण आता पुढे येत आहे.


लोकसभा आपल्यालाच लढायची आहे, असे ठरवून देवकरांनी महापालिका निवडणुकीत खान्देश विकास आघाडीला पूरक भूमिका घेतली. शहरातील मतदार मदत करतील आणि आपण लोकसभा जिंकू, ही त्यांच्या तयारीची बाजू होती. या राजकीय चातुर्याबद्दल त्यांची जाहीर स्तुतीदेखील झाली होती; परंतु दुर्दैवाने त्यांना लोकसभेची संधी मिळाली नाही. तसेच शहरात ते थेट विरोधकांना मिळाले नाही आणि थेट विरोधही केला नाही. याशिवाय धरणगावमध्येही त्यांनी नगरपालिका निवडणुकीतील पक्षांतर्गत वादाचे भिजत घोंगडे कायम ठेवले. या दोन्ही बाबी आता पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. विधानसभेच्या वादातूनच या मतदारसंघातील राजकारण ढवळून निघाले आहे.


यांच्याभोवती फिरतेय राजकारण
पुष्पा महाजन यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केल्यास मोकळेपणाने काम करण्याची भूमिका ज्ञानेश्वर महाजन यांनी घेतली आहे. दुसरीकडे आमदार सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत अलिप्त धोरण स्वीकारणारे संजय पवार हे या मतदारसंघातील दुसरे दावेदार आहेत. सक्रिय होत नसल्याची टीका होत असलेले गोपाळ देवकर आणि वाल्मीक पाटील हे गटबाजीचा गदारोळ व विधानसभेच्या चर्चेने कामाला लागले आहेत. धरणगावातील महाजनविरोधी नगरसेवकांची समजूत काढण्याचे काम त्यांनी केले.

उमेदवार चिंतित
डॉ.सतीश पाटील यांच्या प्रचाराचा अश्वमेध रोखण्याचे काम धरणगावातील पक्षांतर्गत असंतोषाने केले. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास तयार नसलेले डॉ.पाटील या निवडणुकीत ताकही फुंकून पित आहेत. या मतदारसंघातील तिढा सोडवण्याची जबाबदारी त्यांनी देवकर सर्मथकांवर सोपवली आहे. मात्र, स्वत: देवकर कारागृहात असल्याने ही जबाबदारी कोणावर टाकावी आणि कोणाची खुशामत करावी यात डॉ. सतीश पाटील यांची चिंता वाढली आहे.