आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्र्यांनी लाटला भूखंड: देवकरांनी नगराध्यक्षपदाचाही केला गैरवापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नगराध्यक्ष असताना पालिकेची मोक्याची जागा हडप केल्याचेही आता समोर आले आहे. चौकशीअंती एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर ही जागा देवकरांकडून काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तसेच पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी त्यांच्या अपात्रतेचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र हे सर्वच प्रस्ताव आज रखडलेले दिसतात.
जळगाव सिटी सर्व्हे नंबर 384/2 या अभिन्यासातील खुली जागा नगरपालिकेचा ठराव क्रमांक 287 दि. 28 नोव्हेंबर 1998 द्वारे 22 नोव्हेंबर 1999 रोजीच्या करारनाम्यामधील अटी-शर्तीनुसार गुलाबराव देवकरांच्या संस्थेस देण्यात आली होती. त्याच काळात देवकर नगराध्यक्ष होते. त्यामुळे पदाचा गैरवापर करून त्यांनी ही मोक्याची जागा आपल्या ताब्यात घेतली व त्या ठिकाणी आपल्याच नावाने सुरू असलेल्या पतसंस्थेचे कार्यालय सुरू केले. या गैरप्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी 1 ऑगस्ट 2005 रोजी लोकशाहीदिनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार शहानिशा केली असता प्रत्यक्ष जागेवर पतपेढी सुरू असल्याचे महापालिकेच्या लक्षात आले होते. त्यामुळे करारनाम्यातील अटींचा भंग केल्याचे आयुक्तांनी देवकरांच्या संस्थेस लेखी कळवले होते.
जागा काढून घेण्याचे आदेश- साबळेंच्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत देवकरांच्या संस्थेने जागेचा वापर चुकीच्या कामासाठी केल्याचे उघडकीस आल्याने याबाबत लेखी खुलासा मागवण्यात आला होता. त्यांनी 9 जून 2004 रोजी दिलेला खुलासा मनपा आयुक्तांनी फेटाळून लावत संस्थेस दिलेली जागा काढून घेण्याचे आदेश 9 नोव्हेंबर 2005 रोजी दिले होते. मात्र त्यानंतरही ती जागा पतसंस्थेच्याच ताब्यात आहे.
अपात्रतेचा प्रस्ताव रखडला- साबळेंच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुलाबराव देवकरांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी राज्य शासनानकडे पाठवला होता. त्यात दोन सुनावण्यासुद्धा झाल्या होत्या. मात्र आजपर्यंत तो अर्ज प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या या जागेत गुलाबराव देवकर सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित कक्षाची खोली बांधण्यात आली आहे. एक-दोन दिवसांना पतसंस्थेचे कार्यालय उघडले जाते. या जागेसाठी तारेचे कुंपण करण्यात आले आहे. तसेच दोन्ही गेटला नेहमी कुलूप लावलेले असते. त्यामुळे परिसरातील जागेचे खरे मालक असलेल्या रहिवाशांना पाय ठेवण्याचीही परवानगी मिळत नाही. तसेच पूर्वी असलेल्या मोठ्या वृक्षांची संख्याही कमी झाली आहे. सध्या काही रोपे लावण्यात आल्याचे दिसते.
मंगळवारी भवितव्य ठरणार- घरकुल घोटाळ्यात आमदार सुरेश जैन यांच्याप्रमाणेच राज्यमंत्री देवकर हेही आरोपी आहेत. या प्रकरणात जळगावच्या सत्र न्यायालयाने देवकरांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर खंडपीठाने हा जामीन रद्द केला होता. दरम्यान, देवकरांनी खंडपीठाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाने त्यांच्या अटकेला तात्पुरती स्थगिती देत 21 आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता मंगळवारी देवकरांबाबत फैसला होईल.