आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेने परप्रांतातून गुटख्याची तस्करी होत असल्याचे झाले सिद्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रेल्वेच्या माध्यमातून गुटख्याची अवैध तस्करी होत असल्याचे शनिवारी झालेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. कमी श्रमात जास्त पैसा कमविण्याची चटक लागलेल्या आरोपी ब्रिजेशकुमार चौरसिया (रा.कानपूर) याला अडीच महिन्यात दुसर्‍यांदा रेल्वे पोलिसांनी अटक केली.

पहिल्यावेळी दीड लाखांचा तर दुसर्‍यांदा शनिवारी (दि.9) त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीचा गुटखा रेल्वे पोलिसांनी जप्त केला. महाराष्ट्रातील गुटखाबंदीच्या निर्णयाला अन्य राज्यातील गुटखा तस्करांकडून सुरुंग लावणे सुरूच आहे. गुटखाबंदी जाहीर झाल्यानंतर गुटखा शौकिनांची पंचाईत झाली. त्यामुळे परराज्यातून गुटख्याची आयात करत त्याची अधिक दरात विक्री करण्याचा गोरखधंदा काहींनी सुरू केला आहे. त्यामुळे बंदी असल्यावरही अनेक दुकानांवर छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. गुटख्याला असलेली मागणी लक्षात घेता रेल्वेद्वारे परप्रांतातून मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची आवक होत असल्याने जीआरपीने दुसर्‍यांदा उघड केले.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर गुटखा महाराष्ट्रात दाखल होतो. 30 नोव्हेंबर 2012 रोजी भुसावळ रेल्वेस्थानकावर दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा रेल्वे सुरक्षाबलाने जप्त केला होता. आरोपी ब्रिजेशकुमार चौरसिया याला अटक झाली होती. यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर पुन्हा 71 दिवसांच्या अंतराने याच आरोपीने कानपूर येथून गुटखा भरलेल्या गोण्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये टाकूत नाशिक गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक लाख रुपये किं मतीच्या गुटख्यासह तो शनिवारी (दि.9) पुन्हा रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रेल्वेने गुटख्याची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होत असताना कानपूरपासून भुसावळपर्यंतच्या प्रवासात कुणालाही संशय आला नाही. एकाही स्थानकावर गोणीमध्ये काय याबाबत विचारणा झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. कानपूर ते भुसावळ या अंतरातील रेल्वेस्थानकांवर गस्त घालणार्‍या आरपीएफ जवानांना याची माहिती नसावी का? कानपूरपासून निघालेला गुटखा भुसावळपर्यंत येताना त्याची साधी तपासणी होऊ नये, हे सुज्ञ मनाला पटणारे नाही. त्यामुळे अन्य प्रांतातील रेल्वे सुरक्षाबलाच्या आशीर्वादानेच, चिरीमीरी करून हा गुटखा महाराष्ट्रात येत असल्याची शक्यता आहे.

प्रयत्न हाणून पाडू
रेल्वेतून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच कारवाई केली जाते. यापूर्वीदेखील दीड लाखांचा गुटखा पकडला होता. भविष्यातही अशाप्रकारची कारवाई सुरूच राहील. गुटखा तस्करांचे प्रयत्न आरपीएफ हाणून पाडेल. गुटखा तस्करांची पाळेमुळे शोधू .
-अजय यादव, निरीक्षक, रेल्वे सुरक्षाबल, भुसावळ