आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा तस्करीची पाळेमुळे भुसावळ शहरात; औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यातही पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणलेल्या गुटखा तस्करीनंतर भुसावळ हेच या व्यवसायाचे मुख्य केंद्र असल्याचा संशय बळावला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून अकोल्यासह औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ही विषवल्ली बिनदिक्कत पोहोचवली जाते. या प्रकरणाच्या मूळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिळालेल्या ‘टिप’वरून बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शनिवारी सकाळी महामार्गावरील हॉटेल तनारिकाजवळ दोन लाखांचा गुटखा पकडला. प्राथमिक अंदाजानुसार हा गुटखा जळगाव किंवा अन्य ठिकाणाहून अकोला जात असल्याचे आढळले. नंतर मात्र या तस्करीचे मूळ भुसावळ शहरातच असल्याचे उघड झाले. केवळ मुख्य केंद्राची (गोदाम) माहिती गुप्त रहावी, यासाठी तस्करांनीच ही अक्कलहुशारी केल्याची जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे केवळ अकोलाच नव्हे तर औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यातही भुसावळातूनच गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा संशय आहे. मुजोर तस्कर आंध्र प्रदेशातून शहरात गुटखा आणण्यासाठी प्रसंगी चोरट्या मार्गाने रेल्वेचा वापर करतात.

चोरट्या मार्गाने आणलेला गुटखा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळपास असलेल्या एका गोदामात साठवला जातो, असा पोलिसांचा संशय आहे. त्या आनुषंगाने स्थानिक पोलिसांनी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

कलम 328 प्रथमच लावले
गुटख्यात ‘मॅग्नेशियम काबरेनेट’ हे घातक रसायन असल्याने राज्य शासनाने त्यावर बंदी आणली. गुटख्याच्या माध्यमातून जनतेला विषारी द्रव्य सेवन केल्याप्रकरणी ‘भादंवि’मध्ये कलम 328 चा उल्लेख आहे. शनिवारच्या कारवाईतील आरोपींवर बाजारपेठ पोलिसांनी हे कलम लावले आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. यात तीन ते पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि यानंतर न्यायालयीन कोठडीची तरतूद असल्याचे पोलिस उप अधीक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले.

तस्करांची अक्कलहुशारी अशी
परजिल्ह्यातून ग्राहक आल्यानंतर त्याचे चारचाकी वाहन महामार्गावर थांबवले जाते. ग्राहकाला सुरक्षित स्थळी थांबवून त्याचे वाहन घेऊन शहरातील गोडावूनमधून गुटखा गाडीत टाकला जातो. यानंतर गाडी पुन्हा महामार्गावर नेऊन संबंधितांच्या ताब्यात दिली जाते. हाच प्रकार शनिवारीदेखील घडला होता.

लवकरच सूत्रधारापर्यंत पोहचू
गुटखा तस्करीप्रकरणी शनिवारी आरोपींच्या अटकेनंतर अकोला येथे पोलिसांचे एक पथक पाठवले आहे. आरोपींना कोठडी मिळाल्यानंतर तस्करी नेमकी कुठून होते? शहरात गोडावून आहे का? याची चौकशी होईल. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी जातील.
-विवेक पानसरे, डीवायएसपी, भुसावळ

रेल्वेतून चोरटी वाहतूक
राज्यात गुटखाबंदी असल्याने तस्कर थेट पश्चिम बंगालमधून गुटखा मागवतात. हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून ही तस्करी होते. पंधरा दिवसाआड एकदा गुटखा शहरात येतो. हावडा एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवर रात्री अडीच वाजेदरम्यान पोहोचते. गाडीतून उतरवलेले पार्सल शनिमंदिर वॉर्ड आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोडावूनवर पोहोचते.

पानटपर्‍यांची तपासणी करा
लाखो रुपये किंमतीचा गुटखा परजिल्ह्यात पाठवताना पकडला जात असेल तर शहरात पानटपर्‍यांवर गुटखा विक्री होत नसेल हे कशावरून? त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने पानटपर्‍यांची नियमित तपासणी करावी, असा सूर उमटू लागला आहे.

चांडाळ चौकडी
रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहरातून गुटखा तस्करी करणार्‍या ‘चौकडी’चा मास्टरमाइंड राजकीय पक्षाप्रमाणेच एका ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत संबंधित असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. तर अन्य दोघे पूर्वीपासूनच सट्टाजुगाराच्या धंद्यात ‘माहिर’ आहेत. स्थानिक पोलिस या चौकडीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शक्यता तपासून पाहात आहेत.