आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा विक्री जोरात; नगरपालिका-पोलिसांची कारवाईकडे पाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयाला 20 जुलैला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र, शहरात अतिरिक्त पैसे मोजून काळ्या बाजारात गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. पालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा ही विक्री थांबवण्यात अपयशी ठरली आहे.

राज्य शासनाने 20 जुलै 2012 रोजी गुटखा बंदीचा निर्णय घेतला. 1 ऑगस्ट 2012 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. यानंतर चौकाचौकांतील पानटपरीवर लटकलेल्या गुटख्यांच्या माळा अचानक गायब झाल्या. गुटख्याची विक्री मात्र थांबली नाही. चोरून-लपून मूळ किमतीच्या दुप्पटीने गुटख्याची विक्री सुरू झाली. प्रचंड कमाई पाहून काही विक्रेत्यांनी गुटख्याची तस्करी सुरू केली. कधी शेजारील मध्य प्रदेश तर कधी पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधून गुटख्याची आयात सुरू आहे.

गुटख्यावर बंदी येताच विक्रीवर काहीसा परिणाम झालेला असला तरी विक्रेत्यांचा नफा मात्र वाढला आहे. एक रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी सध्या पाच रुपयांना मिळते. दुसरीकडे गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने एकही कारवाई केलेली नाही. मध्यंतरी पोलिसांनी अडीच लाखांचा गुटखा पकडला. मात्र, मुख्य सूत्रधार उजेडात आलेले नाहीत.

अन्न व औषध प्रशासनाने हाती घ्यावी धडक मोहीम; सातत्याने व्हावी तपासणी
> गेल्या आठवड्यात तस्करी उघड होऊन मुख्य सूत्रधार अजून मोकाटच
> स्थानक परिसरासह शहरातील चौकाचौकात होते खुलेआम गुटखा विक्री
>अन्न औषध प्रशासन, पालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिस सुस्तावले

कारवाई व्हावी
पालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी. आम्ही 31 मे रोजी मुख्याधिकारी आणि प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र, उपयोग झाला नाही.
-स्वप्नील चौधरी, जिल्हा संघटक, नशाबंदी मंडळ

सर्रास विक्री
शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात पानटपर्‍यांवर उघडपणे गुटखा, पानमसाला विक्री होते. धावत्या रेल्वेतही काही गुटखा विक्रेते दिसतात. लोहमार्ग पोलिस ठाण्यासमोर तर दिवसाढवळ्या गुटख्याची विक्री होते.