आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेजवळ सर्रास गुटखा विक्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली असली तरी त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे शहरातील दहा शाळांची पाहणी केली असता स्पष्ट झाले. मुख्याध्यापकांनाही गुटखा विक्रेत्यांना रोखण्यास मर्यादा येत आहेत. मात्र, शाळेच्या मधल्या सुटीत किंवा शाळा सुटल्यानंतरही गुटखा विक्रीच्या दुकानांवर आढळणा-या शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. यात शिक्षकही मागे नाहीत. डी. बी. स्टारने अशा दुकानांवर माहिती घेतली असता शिक्षकांना गुटखा आणण्यासाठीही विद्यार्थ्यांना पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेच्या बाहेर विद्यार्थी काय करतात, याच्याशी मला कर्तव्य नाही, अशी भूमिका घेत मुख्याध्यापक, शिक्षक शासनाच्या निर्णयावर हात झटकत आहेत. आरोग्यास घातक ठरणा-या गुटखा, तंबाखूच्या सेवनाचे धोके समजून सांगण्यापलीकडे शाळेत काहीही होत नाही. ठोस उपाययोजनेसाठी शाळेच्या परिसरातील गुटखा विक्री रोखणे आवश्यक आहे. ते रोखण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
फलक गेले कुठे? - शाळेच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीस बंदी असल्याचे फलक प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक असले तरी त्याची एकाही शाळेने दखल घेतलेली नाही. शहरातील 15 शाळांची पाहणी केली असता कोणत्याही शाळेच्या प्रवेशद्वारावर बंदीचा फलक लावलेला आढळला नाही. शिवाजीनगर भागातील महापालिकेची उर्दू शाळा, बहिणाबाई विद्यालयाचा परिसर, विद्यानिकेतन शाळा, नंदिनीबाई मुलींची शाळा, ओरियन स्कूल, आर. आर. विद्यालय, सेंट जोसेफ स्कूल, शकुंतला माध्यमिक विद्यालय आदी शाळांच्या परिसरात गुटखा विक्रीची दुकाने आढळली.
फलकांबाबत आढावा घेऊ - शासन निर्णयच आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. शाळेच्या आवाराबाहेर जर गुटखा विक्री किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल तर ते चूक आहे. प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असल्याचे फलक लावणेही आवश्यक आहे. त्याबाबत लवकरच आढावा घ्यावा लागणार आहे. - आर. एस. मोगल, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जळगाव
..तर कर्करोगाला आमंत्रण - गुटखासेवनाने कर्करोगापूर्वीची पहिली स्टेज तोंड न उघडणे ही असते. त्याला ‘सबम्युकोसल सायब्रोसिस’ म्हटले जाते. त्यावर उपचार म्हणून तोंडात इंजेक्शन द्यावे लागतात, जे अतिशय वेदनादायी असतात. दात सडणे, त्यामुळे होणारे इन्फेक्शन हे आणखी काही दुष्परिणाम आहेत. - डॉ. अंजू अमरेलीवाला, एमडी मेडिसीन, जळगाव
शासनानेच पथक निर्माण करावे - शासनाच्या आदेशानुसार जर असे निदर्शनास आले तर मुख्याध्यापकाने कारवाई करावी. मात्र, याबाबत मुख्याध्यापकाने कोणताही पवित्रा घेतला तर त्याला लोकच धमकावतात. मुख्याध्यापकाविरुद्ध तक्रारी करतात. अशा वेळी अधिका-यांनी मुख्याध्यापकाचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. मुळात ज्या वेळी शिक्षणाधिकारी शाळेला भेट द्यायला येतात, त्या वेळी त्यांनीच या गोष्टीकडे लक्ष द्यावे. मुख्याध्यापकाच्या संपूर्ण संरक्षणाची हमी जर घेतली जात असेल तर ते पुढे येतील. शासनाचा आदेश असल्याने त्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच स्वतंत्र पथक निर्माण करायला हवे. त्यामुळे मुख्याध्यापकालाही त्रास होणार नाही. - राजेंद्र सपकाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
मुख्याध्यापकांची जबाबदारी - महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरणारे गुटखा, तंबाखूची विक्री बंद करण्याबाबत आम्ही दुकानदारांना समजून सांगू. मुख्याध्यापकांचीच ही जबाबदारी आहे. त्यांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष असले पाहिजे. शाळेच्या बाहेर जरी विद्यार्थी गुटखा खात असेल तर त्याला रोखले पाहिजे. केवळ शाळेच्या आवारापुरती मुख्याध्यापकाची किंवा शिक्षकाची जबाबदारी नाही. आम्ही विद्यार्थ्यांना गुटख्याच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली आहे. मुळात शिक्षणाधिका-यांनी आधी शिक्षकांच्या गुटखा खाण्यावर बंदी घालावी. गुटखा खाणाराच जर मुलांसमोर प्रतिज्ञा वाचून सांगत असेल तर काय फायदा? - टी. एस. चौधरी, मुख्याध्यापक, बहिणाबाई विद्यालय, जळगाव