यावल : निर्मल शहराकडे वाटचाल सुरू केलेल्या पालिकेने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आळा घालण्यासाठी गुडमॉर्निंग पथक नेमले आहे. हे पथक उघड्यावर शौच करणाऱ्यांचा गुलाबपुष्प देवून गांधीगिरी करते. तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामाचे फायदे पटवून देत त्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहितीदेखील देते. तसेच पालिकेने प्रत्येकी १० सीटचे तीन फिरते शौचालयदेखील उपलब्ध करून दिले आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी पालिका १५ हजारांचे अनुदान देते. या योजनेतून आतापर्यंत यावलमध्ये ५०२ शौचालये बांधून पूर्ण झालेली आहेत, तर ६८९ लाभार्थ्यांच्या शौचालयांचे काम सुरू आहे. या पुढील टप्प्यात संपूर्ण शहर निर्मल व्हावे, असे पालिकेचे प्रयत्न आहेत.
यासाठी जनतेमध्ये प्रबोधन करण्यासाठी पालिकेने पथके नेमली होती. गेल्या १० डिसेंबरपासून कार्यरत या पथकांनी १० जानेवारीपर्यंत संपूर्ण शहरात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी गरजूंकडून १९०८ अर्ज प्राप्त करून घेतले. या सर्व अर्जांची छानणी केल्यानंतर संबंधितांना प्रत्येकी १५ हजारांचे अनुदान मिळेल. या मोहिमेतून २६ जानेवारीपर्यंत शहर हागणदारीमुक्त व्हावे, असे पालिकेचे प्रयत्न आहेत.
तसेच शहरातील उघड्यावरील हागणदारीला आळा घालण्यासाठी पालिकेने १४ गुडमॉर्निंग पथकांची स्थापना केली आहे. हे पथक पहाटेपासूनच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या हाती गुलाबपुष्प देत गांधीगिरी करते.
लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, स्वच्छता निरिक्षक रमाकांत मोरे, कनिष्ठ अभियंता एस.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही स्थितीत येत्या मार्चपर्यंत हागणदारी मुक्तीचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी यावल पालिकेने चालवलेल्या प्रयत्नांना शहरातूनदेखील प्रतिसाद मिळत आहे. यामुळे निर्मल शहराचे उद्दिष्ठ गाठता येवू शकते.
पावणेदोन कोटी वितरित
शहरात ५०२ शौचालये पूर्ण करण्यासाठी ७५ लाख ३० हजारांचे अनुदान देण्यात आले आहे. आता ६८९ शौचालयांसाठी कोटी लाख ३५ हजारांचे अनुदान वितरित होईल. एकुण कोटी ७८ लाख ६५ हजार रूपये वितरित होतील.
तीन फिरती शौचालये
शहरातील आठवडे बाजार भागात महिला पुरूषांकरीता प्रत्येकी एक असे दहा सीटचे दोन, तर सुतारवाडा भागात महिलांसाठी दहा सीटचे एक असे तीन सार्वजनिक फिरते शौचालये ठेवण्यात येतील. या तिन्ही शौचालयांची पालिकेने दुरुस्ती केली आहे.
-स्वच्छ सुंदरशहरनिर्मितीसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक शौचालय बांधून घेतल्यास हा हातभार लावता येईल. त्यासाठी शासनाकडून १५ हजार अनुदानदेखील मिळत आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा.
सुरेखा कोळी, नगराध्यक्षा, यावल
- सध्या गुडमॉर्निंग पथक गांधीगिरी करत आहे.वैयक्तिक सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था उपलब्ध झाल्यावर जर कुणी उघड्यावर शौचास आढळला, तर त्याचे फोटो काढून शहरात मोठे बॅनर लावू. प्रसंगी पोलिसात गुन्हा दाखल होईल.
सोमनाथ आढाव, मुख्याधिकारी, यावल