आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीट, अवकाळी पावसाने दिला तब्बल तीन कोटींचा फटका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे तालुक्यात शेतकर्‍यांचे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्या दावा आमदार प्रा. शरद पाटील यांनी केला आहे. या नुकसानीची त्यांनी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांच्या समवेत पाहणी केली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. ते केवळ फार्स ठरू नये अशी सूचना त्यांनी पाहणीप्रसंगी त्यांनी अधिकार्‍यांना केली.

या पाहणी दौर्‍यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर जाधव, नेरचे सरपंच शंकर खलाणे, तालुकाप्रमुख मनीष जोशी, उपसरपंच पंकज जैन, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाप्रमुख गुलाबराव बोरसे, पंचायत समिती सदस्य संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य वसंत देशमुख, विभागप्रमुख बाळू शंखपाळ, डिगंबर देवरे, प्रभाकर माळी, कृष्णा खताळ, राजेंद्र शिंदे, चुनीलाल बोरसे आदी सहभागी झाले होते.

पावसामुळे धुळे तालुक्यातील नेर,भदाणे, देऊर, खंडलाय, अकलाड, कावठी शिवारात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, मिरची, डाळिंबाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती उत्पादनात घट झाली होती. धुळे तालुक्यातील विविध भागात यंदा अतिवृष्टी झाली असताना दुसरीकडे नेर, खंडलाय, कावठी, देऊर, शिरधाने प्र.नेर येथे कमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात नुकसान भरून काढण्यासाठी अधिक प्रमाणात पेरणी केली होती ; परंतु आता अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा, अशी सूचना या वेळी आमदार प्रा. पाटील यांनी अधिकार्‍यांना केली. तालुका कृषी अधिकारी गागरे यांच्यासह उपस्थित होते.

घरकुलांसह पिकांचे नुकसान
देऊर येथे गारपिटीमुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पडझड झाली आहे. भदाणे शिवारात पिकांचे नुकसान झाले आहे. नेर, महालकाली, महाल कानडामाना, महाल नूरनगर, महाल कसाड या पाचही क्षेत्रातील गहू, कांदा नष्ट झाला आहे. कुसुंबा, अकलाड, कावठी शिवारातही कांदा, गहू, डाळिंब, मिरची, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय भदाणे, खंडलाय शिवारात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

अधिवेशनात मुद्दा मांडणार
गेल्या 11 वर्षांत तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वादळवार्‍यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. एक-दोन पंचनामे वगळता शासनाने मदत दिलेली नाही. निदान आता तरी शासनाने तत्काळ मदत करावी. पंचनामे करण्याची प्रक्रिया फार्स ठरता कामा नये. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 24 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. अधिवेशनात शासनाकडे पाठपुरावा होईल. प्रा. शरद पाटील, आमदार