आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half Nationalist Members Disappeared In Jitendra Awhad Meeting

प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या आढावा बैठकीत अर्धी राष्ट्रवादी गायब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - लोकसभेची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी भुसावळात बैठक घेतली. मात्र, या बैठकीला पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह पालिकेतील 25 पैकी 21 नगरसेवकांची अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. बैठकीला शहरातील अर्धी राष्ट्रवादीच गायब असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.


राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आव्हाड मंगळवारी कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त विटवा (ता.रावेर) येथे आले होते. रावेरमधील कार्यक्रमानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भुसावळातील लोणारी हॉलमध्ये आढावा बैठक घेतली. पालकमंत्री संजय सावकारे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार अरुण पाटील, दिलीप सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी, अँड. रवींद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करतानाच आव्हाड भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घसरले. भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे विधानसभेत आरोप करून 24 तासांत तोडीपाणी करून मोकळे होतात. तसेच 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करणार्‍या खडसेंचे गणित कच्चे असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्थानिक विषयांना स्पर्श न करता आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवरील विषय छेडून भाषण आटोपले. यानंतर बैठकीला उपस्थित इतर वक्त्यांनी येणार्‍या निवडणुकीत राज्यात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीलाच यश मिळेल, असा दावा केला.


चौधरींचा पडला विसर
भुसावळ राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे वेगवेगळे गट आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार ईश्वरलाल जैन यांनी दोघांच्या मनोमिलनाची तळी उचलली होती. यासंदर्भात प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी चौधरींचा एकदाही नामोल्लेख करण्याची तसदी घेतली नाही.


राष्ट्रवादी ताकदवाल्यांचा पक्ष
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यावल, रावेर आणि केळीपट्टय़ासाठी 95 कोटी रुपयांचे करपा निर्मूलनाचे पॅकेज दिले. या मुळे असंख्य शेतकर्‍यांना फायदा झाला. राष्ट्रवादी हा मराठय़ांचा पक्ष नसून ताकदवाल्यांचा पक्ष आहे. अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस