जळगाव- राज्यभरातील जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी अपंगत्वाविषयी प्रमाणपत्रे दिली जातात. गर्दी आणि बनावट दस्तऐवजावर उपाय म्हणून राज्य शासनाने संगणकीय प्रमाणपत्र आवश्यक केलेले आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळपासूनच आरोग्य विभागाची वेबसाइट हँग झाल्याने तीन तास प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प होते. महिनाभरापासून टोकन पद्धतीने प्रमाणपत्र देणे सुरू केले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एन.लाळीकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
टोकन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा
अपंग प्रमाणपत्र वितरण हा कायमच वादाचा मुद्दा आहे. त्यावर उपाय म्हणून गेल्या महिन्यापासून टोकन पद्धती सुरू केल्याचे डॉ. लाळीकर यांनी सांगितले. या पद्धतीमुळे उपस्थित 75 अपंग बांधवांना सकाळी नऊला टोकन दिले जाते. तपासणी करून त्यात पात्र ठरणार्यांना त्याच दिवशी सायंकाळी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे होणार्या गैरप्रकारांना आळा बसला असल्याचा दावा त्यांनी केला.
शुक्रवारी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण
जिल्हा रुग्णालयात 21 मार्चला फक्त अस्थिव्यंग प्रमाणपत्रांच्या नूतनीकरण केले जाणार आहे. ज्यांच्याकडे अपंगत्वाची कायम प्रमाणपत्र आहेत, अशांनी नूतनीकरणासाठी येण्याची गरज नसल्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अहिरे यांनी सांगितले.
प्रमाणपत्र शासकीय कागदावर
अपंग प्रमाणपत्र पूर्वी साध्या कागदावर मिळत होते. मात्र, बुधवारपासून शासनाने दिलेल्या कागदावर हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या कागदावर शासनाचा क्रमांक आणि बारकोड असल्याने बोगस प्रमाणपत्रांना आळा बसेल.