आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विमानतळावर हँगरसाठी पर्याय देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव विमानतळावरून मुंबईत जुहू विमानतळावर लँडिंगची परवानगी मिळालेल्या सिल्व्हर ज्युबिली कंपनीला विमानतळ प्राधिकरण हँगरसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे कंपनीने दिवाळीपर्यंत विमानसेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. इतर विमानतळावरील विमानसेवेचे वेळापत्रक आणि राज्य शासनाकडून व्हॅटमध्ये सवलत मिळविण्यासाठी कंपनीने प्रस्ताव दिला आहे.

जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सिल्व्हर ज्युबिली कंपनीपुढे हँगरसह मुंबई, पुण्यातील लँडिंग परवानगी मिळविण्याचे आव्हान होते. त्यात जुहू विमानतळामुळे मुंबईतील लँडिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. हँगरचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाकडे आहेत. हँगरची उभारणी प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राधिकरणाने कंपनीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. जुहूसह इतर शहरातील हँगरवरून त्यांना सेवा मिळण्याची शक्यता आहे.


कंपनीच्या टीमकडून भेट
प्राधिकरणाकडून सहकार्य मिळत असल्याने गेल्या आठवड्यात कंपनीच्या टीमने जळगावात येवून जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्ती व उद्योजकांच्या भेटी घेतल्या. विमानसेवेचे अंतिम वेळापत्रक तयार करून सेवा सुरू करण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार आहे; परंतु सर्व स्तरावर सहकार्य मिळाल्यास दिवाळीत आम्ही जळगाव विमानतळावरून टेकऑप करू शकणार असल्याचा विश्वास त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

शासनाकडून हवे सहकार्य
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये विमानसेवेवर 25 टक्के व्हॅट आहे. उर्वरित महाराष्ट्रातील सेवेसाठी तो केवळ 4 टक्के आहे. राज्य शासनाने या दोन शहरांसाठी ‘व्हॅट’मध्ये सवलत द्यावी, विमानतळावर मोफत पोलिस संरक्षण देण्यात यावे; या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनामध्ये झालेल्या कराराला मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या राज्य शासनाकडे करण्यात आल्या असून त्यावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.