आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हंजीर’प्रकरणी पालिका प्रशासन अजूनही सुस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कचर्‍यावर प्रक्रिया बंद करून कराराचा भंग केल्याप्रकरणी हंजीर बायोटेकविरुद्ध आरोग्य अधिकार्‍यांनी फौजदारी कारवाई करण्याचा महिनाभरापासून डांगोरा पिटला जात आहे. मात्र, फौजदारी दाखल करण्यासाठी सुरू असलेली चालढकल पाहता पालिकेच्या हालचालीच संशयास्पद वाटत आहेत. प्रशासनाची सुस्त भूमिका मक्तेदाराच्या पथ्यावर पडत आहे.

पालिकेला न कळवता हंजीर बायोटेकतर्फे घनकचरा प्रकल्प सुमारे सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित मक्तेदारावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी आयुक्तांनी दिले होते. तक्रार दाखल करण्याचे अधिकार पूर्वी अतिरिक्त आयुक्त साजिद पठाण यांना दिले होते. कौटुंबिक कारणांमुळे मध्यंतरी ते रजेवर गेल्याने हे अधिकार नंतर आरोग्य अधिकारी विकास पाटील यांना देण्यात आले होते. या प्रक्रियेत महिना उलटून गेला. यानंतर तक्रार कशी असावी? ती कुणाकडून तयार करावी, या विचारात काही दिवस गेले. पालिकेच्या विधिज्ञांकडून तक्रार लिहिण्यात येऊन ती तालुका पोलिसांत देण्यात आली होती.

मात्र, पोलिसांनी आपल्या विधिज्ञांकडून तपासणी केल्यावर हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नसून दिवाणी स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत तक्रार अर्ज पालिकेला परत दिला. गेल्या आठवड्यात 20 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांच्या नावे निवेदन देऊन तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. या गोष्टीला आठ दिवस उलटूनही अर्जाचे काय झाले? याचा तपास करण्याची तसदी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाची सुस्त भूमिका संशयास्पद वाटत आहे.