आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूरचे २४ दरवाजे उघडले, बऱ्हाणपूर, टेक्सा परिसरात मुसळधार पावसाचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे शनिवारी धरणाचे दरवाजे एक, तर २० दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून प्रतिसेकंद १००८ क्युमेक्स वेगाने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.
हतनूरच्या तापी आणि पूर्णा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार आणि शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे तापीसह पूर्णा नदीतून आवक वाढली. परिणामी, शनिवारी सकाळी ८.३० वाजता धरणात ६० टक्के साठा निर्माण झाला. पाण्याची वाढती आवक पाहून २४ दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे. धरणात शनिवारी रात्री वाजता २११. ८९० मीटर जलपातळी, २७५.५० दशलक्ष घनमीटर साठा होता. पाणलोट क्षेत्रातील बऱ्हाणपूर येथे २७, देडतलाई १, टेक्सा ५२, ऐरडी ४.२, लखपुरी आणि चिखलदरा येथे १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

भुसावळ तालुक्यातगेल्या तीन दिवसांपासून दररोज रिपरिप पाऊस होत आहे. तीन दिवसांत केवळ १८.६ मिमी पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. रिपरिप पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

भुसावळ शहरासह तालुक्यात तब्बल महिनाभरापासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. गुरुवारपासून रिपरिप पाऊस होत असल्याने पिकांना काही प्रमाणात संजीवनी मिळाली आहे. मात्र, अजूनही रिपरिप पावसाने जमिनीत ओल झालेली नाही. केवळ पिकांना आठवडाभर दिलासा मिळण्याइतपत पाऊस झाला आहे. भुसावळ शहरात गुरुवारी ३.८, शुक्रवारी २.२ तर शनिवारी १२.६ अशी एकूण १८.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अत्यल्प पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील किमान हजार हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता आहे.

यंदाच्या खरीप हंगामात हतनूर धरणात पाण्याची उशिराने आवक झाली. आता मात्र तब्बल ६० टक्के साठा असल्याने स्थिती समाधानकारक असल्याची माहिती उपविभागीय अभियंता एस. आर. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

तरच ओलावा वाढेल
दोनते तीन दिवस सलग जोरदार पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढेल. तरच उष्णताही कमी होऊन पिकांची वाढ होईल. या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. श्रीकांत झांबरे, कृषीअधिकारी, भुसावळ