जळगाव- शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरावर म्युरल शिल्प शैली या कला प्रकारातील सजावट करून दर्शनी भागाला नवा लूक दिला आहे. या प्रकारात टाइल्सचे तुकडे, सिरॅमिक्स, प्लास्टर ऑफ पॅरिस, ऑइल पेंट व काचेवर वापरण्यात येणार्या रंगांचा वापर केला आहे. अशा प्रकारचे हे शहरातील पहिलेच मंदिर आहे.
ख्रिस्तपूर्व काळात चर्चमध्ये काचेच्या तुकड्यांपासून तयार केलेली मोझेक चित्रे आजही आपणास पहावयास मिळतात. ग्रीक आणि रोमनांनी शिल्पकला व वास्तुकलेतही बरेच नवे प्रयोग केले आहेत. त्याचप्रमाणे भारतात हेमाडपंती मंदिरांची प्राचीन शैली आजही आपणास पहावयास मिळते.
काळानुरूप आता मंदिरेही सिमेंट कॉँक्रिटमध्ये निर्माण केली आहेत. याचे उत्तम उदाहरण गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिर. या मंदिराची निर्मिती सन 1948 मध्ये करण्यात आली. सध्या याठिकाणी एकूण चार देवतांच्या मूर्ती आहेत. यातील शिव परिवार या मूर्तीची स्थापना 1986 मध्ये केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर मूर्तींची स्थापना येथे करण्यात आली. चार देवतांच्या मूर्तीं असल्या तरी हनुमान मंदिर म्हणूनच हे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. यात महादेव , गुरुदत्त व विठ्ठल- रुख्मिणी यांची ही मूर्ती आहेत. म्युरल शिल्प शैली ही मोझेक शैलीशी मिळतीजुळती आहे. यात शिल्प पार्श्वभागापासून 1 ते 2 इंच वर असल्याने ती अधिक आकर्षक व उठावदार दिसते.