आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haribhau Jawale News In Marathi, Haribhau Speaking In Rally At Jalgaon, Divya Marathi

मी अजूनही खासदार, ‘माजी’ करण्याची घाई का?: हरिभाऊ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अजून 15 एप्रिलपर्यंत आपण खासदार असताना माजी खासदार करण्याची एवढी घाई का करता आहात, असा प्रश्‍न खासदार हरिभाऊ जावळेंनी महायुतीच्या मेळाव्यात केला. पक्षाकडून सहानुभूती मिळत नाही; पण निदान टिंगलटवाळकी तरी करू नका. माझी भावना समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. तेव्हा उपस्थित सारेच आवाक झाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी जावळेंना येताना पाहून सूत्रसंचालकाने ‘माजी खासदार’ असा त्यांचा उल्लेख केला. ते ऐकून खासदार जावळे यांनी आपण अजून खासदार असल्याची जाणीव करून दिली.

देशाचा कृषीमंत्री भूमिहीन
देशाचे कृषिमंत्री शरद पवार जिल्ह्यात आहेत पण त्यांना आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना भेटण्यास वेळ नाही. पण जैन हिल्सवर थांबायला वेळ आहे. शरद पवार हे शेतकरी आहेत. शेतकर्‍यांचे मार्गदर्शक आहेत. पण त्यांच्या नावावर एक एकरदेखील शेती नाही. देशाचा कृषिमंत्री भूमिहीन शेतकरी आहे. राज्यसभेसाठी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तसे नमूद असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

चिमणराव पाटील : आता ताकद दाखवण्याची वेळ असून मतभेद दूर करावे. पहिल्यांदाच नेहरू, गांधींव्यतिरिक्त बिगर कॉँग्रेसी माणसाचा करिश्मा निर्माण झाला आहे. गाफील राहून चालणार नाही. ए.टी.पाटील व माझ्यात काही मतभेद असतील; पण मी मोदींच्या प्रेमात आहे आणि गुलाबराव पाटील एटींच्या प्रेमात आहेत. कोणी काहीही बोलो, फरक पडणार नाही. नानांनी आम्हाला कमी छळलेले नाही; पण आता निवडून आल्यावर छळू नका. जो गद्दारी करतो त्याला बक्षीस मिळते व प्रामाणिकाला शिक्षा, हे बदलायला हवे.

हरिभाऊ जावळे : भाजपा हा एक परिवार आहे. माझ्या ऐवजी माझ्या मुलीला उमेदवारी दिली आहे असे मी मानतो; पण उमेदवारी बदलल्यावर काहींनी आनंद व्यक्त केला. जळगावात फटाके फोडले. सहानुभूती ऐवजी टिंगलटवाळी केली जाते तेव्हा वाईट वाटते. ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी बदलली त्या ठिकाणी असंतोषाचे वातावरण आहे; पण मी संघाचा स्वयंसेवक असल्याने नाराज झालेलो नाही. पक्षाने भरपूर दिले. बरेच वर्षे खासदार, आमदार राहिल्याने कार्यकर्ते जवळ होते. त्यांना आणि परिवाराला वाईट वाटणे सहाजिक आहे.

गिरीश महाजन : राज्यात 28 पैकी दोन जागांवर महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे आपण कोटा भरून काढला आहे. प्रतिस्पध्र्यांना विजयाचा आत्मविश्वास आहे; पण तो फाजील आत्मविश्वास आहे. आता त्यांची परिस्थिती वाईट आहे. आमदारकीही गेल्याने हातात काहीच राहाणार नाही. आमच्यातही वाद आहेत; पण ते तत्त्वाचे आहेत. पक्षासाठी, पक्ष वाढीसाठी आहेत.स्वत:च्या फायद्यासाठी भांडण नसून कोणी मोठा होईल, म्हणूनही भांडत नाही. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून दोन्ही जागा राखायच्या आहेत.

एकनाथ खडसे : हरिभाऊ जावळेंचे तिकीट कापले नसून बदलले आहे. माझी सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली होती; पण ऐनवेळी बदलण्यात आले. उमेदवारी मागण्यापर्यंत माझी पक्षात पत घसरलेली नाही. सद्या कार्यकर्त्यांना नोटीस दिली जातेय, पण गुन्हेगारांना नाही. कारण त्यांना राजकीय आर्शय आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज 4 रोजी भरले जाणार असून खासदार गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पांडुरंग फुंडकर हे नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून द्यायची आहे.