आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haribhau Jawale News In Marathi, MP, BJP, Divya Marathi

धनाचं जाऊ द्या, तन अन् मनाने काम करू या;खासदार जावळेंचे कार्यकर्त्यांना टॉनिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - ‘नाथाभाऊ अन् मी परका नाही. उमेदवार रक्षा खडसे असो की, मी स्वत:. एक लाख मताधिक्क्याने जागा निवडून आणायची आहे. माझ्यासह आपली प्रत्येकाची बांधिलकी भाजपशीच आहे. सध्या खूप चर्चा आहेत, लक्ष देऊ नका. आपलं काम सुरू ठेवा. धनाचं जाऊ द्या तिकडे. मात्र, तन अन् मनाने काम करू या.’, हे बोल आहेत विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे. निमित्त होते भुसावळात झालेल्या बैठकीचे.


शहरातील सिंधी कॉलनीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी प्रभागप्रमुख, बूथप्रमुखांची बैठक घेतली. त्यात खासदार जावळे हे उमेदवारी बदलाच्या वार्‍यांच्या दिशेसंदर्भात काय विधान करतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचा आततायीपणा न करता त्यांनी जे साडेनऊ मिनिटांचे भाषण केले ते ‘व्यक्ती नव्हे, पक्ष मोठा’ या उक्तीचा प्रत्यय आणून देणारे ठरले. कार्यकर्त्यांच्या सामग्रीच्या बळावरच निवडणुका जिंकता येतात, असा कानमंत्र त्यांनी या बैठकीत दिला. त्यांनी या बैठकीत हसमुखपणे केलेली एंट्री ही पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाहीच, असेच संकेत देत होती. कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत करताच त्यांनी जेव्हा हे गुलाबपुष्प नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तेव्हा उपस्थितांच्या चेहर्‍यावर हास्याची हलकीशी लकेर उमटली. शेवटच्या रांगेत बसलेला एक कार्यकर्ता हळूच उजव्या हाताचा इशारा करून ‘आपल्या फुलाचंही (कमळ) प्रेम कायम असलं तर बरं होईल’, असं ओठातल्या ओठात पुटपुटला. आपल्याकडे कुणी तरी बघतय हे लक्षात आल्यावर मात्र, त्याच्या शेजारच्या मित्राने मांडीवर हाताने जोर देऊन त्याच्या व्यक्त होणार्‍या भावनांना आवर घातला. बैठकीतील हे चित्र मात्र, बरंच काही सांगून गेलं. जिल्हा चिटणीस अजय भोळे, महिला आघाडीच्या अलका शेळके, प्रा. सुनील नेवे, गिरीश पाटील, हिरालाल चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शहरप्रमुख रमण भोळे यांनी प्रास्ताविक केले.


धांडे गुरुजींनी घेतला गृहपाठ
‘वन बूथ टेन यूथ’ संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय धांडे यांनी प्रभागप्रमुख व बूथप्रमुखांचा आढावा घेतला. त्यांनी प्रभागप्रमुखांना आपल्या प्रभागात किती बूथ, किती मतदार, किती मृत आहेत, अशा प्रश्नांचा भडीमार केला. अनेकांना तर आपल्याकडे बूथप्रमुखाची जबाबदारी आहे, याचीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. 12 प्रभागप्रमुखांपैकी 10 हजर तर दोन अनुपस्थित होते. 124 बूथप्रमुखांपैकी 45 जण उपस्थित होते. नगरसेवक तथा प्रभाग क्रमांक एकचे प्रमुख प्रमोद नेमाडे व प्रभाग 12 चे प्रमुख मंगेश पाटील यांच्या व्यतिरिक्त उर्वरित जण डॉ. धांडे गुरुजींनी घेतलेल्या गृहपाठात कच्चे ठरले.


‘आजचा एक पकडून 17 मतदार मृत’
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. त्यासाठी भाजपाचेचे बूथप्रमुख, प्रभागप्रमुख हजर राहणे अनिवार्य होते. मात्र, असे असले तरी खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक निक्की बत्रा हे स्वयंस्फूर्तीने या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे खासदार हरिभाऊ जावळे यांनी त्यांचे स्वागत करून पाठीवर कौतुकाची थाप मारली. बैठकीच्या समारोपानंतर जावळेंनी कार्यकर्त्यांसोबत वडापावचा घेतलेला अल्पोपहार हा त्यांच्यासाठी ऊर्जा देणारा ठरला. डॉ. धांडेंनी मतदार याद्यांचा अभ्यास पूर्ण झाला का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर प्रभाग क्रमांक 12 वरील बूथप्रमुख म्हणाला की, ‘अभ्यास पूर्ण झाला आहे. आजचा एक पकडून आमच्या बूथमध्ये 17 मृत आहेत’. हजरजबाबी कार्यकर्त्याने हे उत्तर दिले तेव्हा स्वत: धांडेंचे हावभावही बघण्यासारखेच होते.