आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर धरण तहानले; पाणलाेट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - हतनूर धरणात जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी पाण्याची आवक झालेली नाही. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील तापी आणि पूर्णा नदीच्या कोणत्याही भागात अद्याप ५० एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याने धरणातील जलसाठा वाढला नसल्याची स्थिती आहे. आता तीन दिवस किमान १०० एमएम पाऊस होत नाही तोपर्यंत हतनूर धरण तहानलेले राहणार असल्याचे संकेत अाहेत. त्यामुळे धरणातून नदीपात्रात साेडण्यात येणाऱ्या अावर्तनावरही प्रश्नचिन्ह लागले अाहे.

भुसावळ विभागासह अर्ध्या जिल्ह्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या हतनूर धरणाची स्थिती यंदा बिकट झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हतनूरचा जिवंत पाणीसाठा संपला. मृत साठाही केवळ ५० दलघमीपर्यंत खालावला आहे. हतनूर धरणात साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाण्याची आवक होते. मात्र, आता जूनचा तिसरा अाठवडा सुरू होऊनही हतनूर धरण तहानलेलेच अाहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या तापीवरील मुलताई जिल्ह्यात पूर्णाचे उगमस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने या दोन्ही नद्यांना अद्यापपर्यंत पूर आलेला नाही. परिणामी, हतनूर धरणात पाण्याची आवक झालेली नाही. गेल्या दहा वर्षांत प्रथमच हतनूरचा मृत साठा वापरला गेला. गेल्या वर्षी हतनूर धरणात मे महिन्यातही ६० टक्के जलसाठा होता. सध्या मात्र हतनूरमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात हतनूरमध्ये सुरुवातीपासून पाण्याची आवक कमी असल्याने शेती वापरासाठी आवर्तन देण्यात आले नव्हते. सध्या जिवंत साठाही संपला असल्याने उजव्या तट कालव्यातून यावल, अमळनेर, चोपडा, धरणगाव आदी नगरपालिकांसाठी विसर्ग करता येणार नाही. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पूर्णा-तापीच्या पाणलाेट क्षेत्रात सलग तीन दिवस सरासरी ४० ते ६० मिमी पाऊस झाल्याशिवाय हतनूर धरणात जलसाठा होणार नसल्याचा अंदाज हतनूर धरणावरील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

असा कळतो अंदाज
हतनूरच्यापाणलोट क्षेत्रातील सात ठिकाणी केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून पाऊस मोजमाप केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवरून दररोज सकाळी गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयास कळवली जाते. पावसाच्या अंदाजानुसार धरणात किती पाण्याची आवक होऊ शकते, किती विसर्ग करता येईल यावरील आराखड्यानुसार पुढील नियोजन केले जाते. मात्र, सातपैकी एकाही केंद्रावर ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली नसल्याने चिंता वाढली अाहे.

हतनूर धरणाच्यापाणलाेट क्षेत्रात सलग तीन ते चार दिवस ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तरच हतनूरमध्ये पाण्याची आवक वाढेल. मात्र, सध्या कोठेही ५० ते ५२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास आठवडाभरात जलसाठा वाढेल. -एस. आर. पाटील, उपविभागीय अभियंता, हतनूर
बातम्या आणखी आहेत...