आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हतनूर पुलाचा भराव खचला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ / वरणगाव - तापी आणि पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या मुळे तापीमधील विसर्ग अचानक वाढून हतनूर (ता.भुसावळ) आणि सावद्याला जोडणार्‍या नवीन पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.

हतनूर आणि सावद्याला जोडणार्‍या नवीन पुलाचा भराव दरवर्षी वाहून जातो. यंदाही ही आपत्ती ओढवली. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शुक्रवारी सकाळी हतनूर धरण आणि नव्या पुलाजवळ खचलेल्या भागाची पाहणी केली.

अधिकारी कोणतेही लक्ष देत नाही, अशी ओरड नागरिकांनी केली. जिल्हाधिकार्‍यांनी पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागाला तातडीने खचलेला भराव पूर्ववत करण्याचे आदेश दिले. या वेळी प्रांताधिकारी राहुल मुंडके, कार्यकारी अभियंता ए.एस.मोरे, एस.आर.पाटील, ए.एन.कुरेशी, उपनिरीक्षक दत्तात्रय परदेशी, संजयकुमार ब्राह्मणे आदी उपस्थित होते.

दगडांची पिचिंग हवी
हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडल्यानंतर दरवर्षी नवीन पुलाचा भराव वाहून जातो. रस्ता दुरूस्तीसाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूने दगडाची पिचिंग करून त्याला ताराची जाळी लावल्यास भराव खचणार नाही, अशी सूचना नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर केली. याबाबत प्रशासनाकडून भविष्यात कृतीशिल प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
टहाकळी, सावतर निंभोरा, हतनूर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी रावेर तालुक्यातील उदळी येथे जातात. तर अभियांत्रिकी, फार्मसी, डीएड् आणि बीएड्, महाविद्यालयीन शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थी फैजपूर येथे जातात. मात्र, नवीन पुलाचा भराव खचल्याने बससेवा बंद होती. इतर वाहनांना प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.

हतनूरमधून 7479 क्युमेक्स विसर्ग सुरू
तापी-पूर्णा नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे 41 दरवाजे साडेसहा मीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून प्रतिसेकंदाला 7 हजार 479 क्युमेक्स विसर्ग होत आहे.

धरणाची जलपातळी शुक्रवारी दुपारी 1 वाजता 211. 350 मीटर होती. जलसाठा 250. 50 दशलक्ष घनमीटर होता. पाणलोट क्षेत्रात बर्‍हाणपूरात 7.2, देडतलाईत 12.6, ऐरडीत 12.2, गोपाळखेड्यात 24.6, लखपुरीत 20.2, चिखलदरात 43.4, हतनूरला 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भुसावळ शहरानजीकच्या तापी नदीला पूर आला आहे. दुथळी भरून वाहणार्‍या नदी परिसरातील हिरव्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी शुक्रवारी दिवसभर यावलरोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूने व इंजिन घाटावर निसर्गप्रेमींनी गर्दी केली होती.