आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापी नदी कोपली; हतनूरच्या ‘बॅकवॉटर’ने शेकडो हेक्टरवरील केळीबागा पाण्याखाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - तापी-पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मोठीच वाढ झाली. या मुळे काठावरील 15 पेक्षा जास्त गावे धोक्यात असून शेकडो हेक्टरवरील केळी आणि अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी रहिवासी भागातही पाणी शिरल्याने नागरिकांनी स्थलांतरास सुरूवात केली आहे.

निंबोल-विटवा, निंबोल-ऐनपूर, पातोंडी आणि निंभोरासीम, विटवे-निंभोरासीम या गावांना ऐकमेकांशी जोडणार्‍या रस्त्यावर सर्वत्र बॅकवॉटर पसरल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. तर अजनाड, अटवाडे, नेहता, दोधे, खिरवड, निंभोरासीम, विटवा, ऐनपूर, कांडवेल, सुलवाडी, कोळदा आणि सिंगत या बारा गावांमध्ये तहसीलदार बबनराव काकडे यांनी अतिदक्षतेचा इशारा दिला. स्थानिक तलाठय़ांना मुख्यालयी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारी आणि गुरूवारी दिवसभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे सुकी आणि भोकर नदीला पूर आला आहे. तालुक्यातील गारबर्डी, मंगरूळ, चिंचारी, अभोडा, गंगापुरी ही धरणे तुंडुब भरली आहेत. दरम्यान, गुरूवारी बॅकवॉटरमुळे गावात आत्पकालीन स्थिती निर्माण झाली आहे. निंबोलमध्ये 500 हेक्टर जमिनीवर पाणी फिरले. पातोंडी येथे 200 हेक्टरवरील केळी आणि खरिपाची पिके पाण्याखाली गेली. ऐनपूर येथे 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधीत झाले. निंभोरासीम येथेही शेतीप्रमाणेच रहिवासी भागात पाणी शिरले. या मुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले आहे.

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता हतनूर धरणाचे सर्व म्हणजे 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 7 हजार 305 क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता यामध्ये चार हजार क्युसेसची वाढ झाली. त्यामुळे तापीमधील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले असून, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.