आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - चातक नेचर कंझर्वेशन सोसायटीतर्फे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस मुक्ताईनगर तालुक्यातील हतनूर धरणावर शास्त्रीयरीत्या ‘पाणपक्षी गणना’ मोहीम राबविण्यात आली. दोन्ही दिवस सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ही पक्षी गणना करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 1 हजार 930 पाणपक्षी कमी झाल्याची नोंद झाली आहे.
हतनूर जलाशयातील जुने टहाकळी, मेहूण, चांगदेव येथे सकाळी पक्षी गणना करण्यात आली. दुपारच्या वनभोजनानंतर तांदलवाडी, मांगलवाडी येथे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोटीतून पक्षी गणना करण्यात आली. त्यात 83 जातीचे 20 हजार 170 पक्षी आढळले. चांदवा 3 हजार 56, वैष्णव 2 हजार 700, मोठा लाल नयनसरी 1 हजार 320, लहान पाणकावळा 1 हजार 632, साधी भिंगरी 1 हजार 103, तारवाली भिंगरी 1 हजार 307 असे पाणपक्षी आढळले. तुतवार, करकोचे, शराटी, नदीसूरय, घनवर, धोबी, मोर, शराटी, फटकडी, पाणकोंबडा, छोटा बटान, पाणलावा, भेंडलावा, सुरमा, चिलखग यांच्यासह स्थलांतरित पाणपक्ष्यांपाठोपाठ येणारे शिकारी पक्षीही आढळले. त्यात मिनखाई घार, दलदल हरीण यांचा समावेश आहे. महापक्षी गणनेत मात्र यंदा तलवार बदक आढळला नाही. गेल्या वर्षी येथे 50 तलवार बदक आढळले होते. परिसरातील तलाव अथवा दलदलीच्या प्रदेशात ते स्थलांतरित झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जातो आहे. पक्षी गणनेत जंगल बचाव समितीचे बाबा हंसराज, उदय चौधरी, यशवंत धांडे, अनंत पाटील, शिवाजी जवरे, समीर नेवे, डॉ.प्रकाश पाटील, काशीनाथ चौधरी, अनिल महाजन, अतुल पाटील, अंकुश पाटील, स्वप्नील कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी हतनूर जलाशयात 22 हजार 100 पाणपक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. यंदा ही संख्या 1 हजार 930 ने घटली आहे. खाद्याची कमी-अधिक उपलब्धता, वातावरणीय बदल, पावसाचे घटलेले प्रमाण अशा विविध कारणांमुळे या जलाशयात पाणपक्ष्यांची संख्या कमी झाली असावी, असा अंदाज पक्षी अभ्यासकांनी वर्तविला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.