आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष: हतनूरचे विस्तारित काम रखडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ विभागाला संजीवनी ठरणारे हतनूर धरण अर्थात संत ‘मुक्ताईसागर’वरील विस्तारित आठ दरवाजांचे काम बंद आहे. या वक्राकार दरवाजांचे काम पूर्ण झाल्यास 40 टक्के गाळाने भरलेल्या धरणातून गाळ बाहेर पडण्यास मदत होईल. मात्र, काम थांबल्याने प्रकल्पाचा खर्च आणि अडचणी वाढणार आहेत.

तापी पाटबंधारे महामंडळाने हतनूर धरणातील गाळाचे उत्सर्जन करण्यासाठी धरणाच्या शेजारीच आठ वक्राकार दरवाजे उभारणीचे काम पाच वर्षांपासून सुरू केले आहे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेले दरवाजे उपलब्ध झाले आहेत. मात्र, दुर्दैवाने बांधकाम पाच वर्षे होवूनसुद्धा अपूर्णच आहे. तापी आणि पूर्णा या प्रमुख नद्यांवर हतनूर धरणाची निर्मिती करण्यात आली. यापैकी पूर्णा महाराष्ट्रातील सर्वाधिक गाळ वाहून आणणारी नदी आहे. परिणामी हतनूर धरणात गाळाचे प्रमाण वाढते आहे. सन 1981 मध्ये निर्मितीवेळी धरणाची क्षमता 388 दशलक्ष घनमीटर जलसाठय़ाची होती. मात्र, आता धरणात तब्बल 40 टक्के गाळ साचल्याने ही क्षमता केवळ 208 दशलक्ष घनमीटर एवढी उरली आहे. 180 घनमीटर गाळ आणि मृत जलसाठय़ाने व्यापला आहे. धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याने तापी पाटबंधारे महामंडळाने विस्तारित आठ वक्राकार दरवाजांची संकल्पना पुढे आणली. पावसाळ्य़ात येणार्‍या पुराच्या प्रवाहामुळे धरणातील गाळ सहज वाहून जावा, असे यामागील प्रयोजन होते. मात्र, दरवाजांचे काम रखडल्याने धरणातील गाळ वाढतच आहे. सध्या विस्तारित दरवाजांसाठी जमिनीपर्यंतचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ वरील काम अपूर्ण आहे.

बंधार्‍याची साफसफाई
सध्या हतनूर धरण प्रशासनाकडून धरणाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले पाणगवत काढणे, साफसफाईची कामे सुरू आहेत. पाण्यात विषारी नागवेल आणि अन्य वनस्पती वाढल्याने जलसाठा दूषित होतो. मात्र, साफसफाईचे काम हाती घेतल्याने ही अडचण सुटेल.

धरणाचे आयुष्य वाढेल
हतनूर धरणाच्या विस्तारित दरवाजांचे काम पूर्ण करण्यासाठी तापी पाटबंधारेच्या वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. विस्तारित दरवाजांमुळे धरणाची साठवण क्षमता वाढणार नाही. मात्र, गाळाचे प्रमाण आहे त्याच स्थितीत ठेवता येईल. पुराच्या प्रवाहात गाळ वाहून जाण्यासाठी मदत होईल. परिणामी धरणाचे आयुष्य वाढेल. एस.आर.पाटील, शाखा अभियंता, हतनूर धरण