आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ जवळील हतनूर जलाशयाला \'आयबीए\'चा दर्जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पशु-पक्ष्यांच्या स्थानिक प्रजातींसह हतनूर धरणावर (संत मुक्ताई सागर) देश-विदेशातून स्थलांतर करून येणारे पक्षी हजारोंच्या संख्येने असतात. या पक्ष्यांचा अभ्यास करून वरणगावच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेने हतनूरचा ‘आयबीए’मध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. सलग पाच वर्षे पक्षीगणना करून ही माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे रवाना केली. यानंतर सोसायटीच्या मदतीने झालेल्या पक्षीगणनेत वेगवेगळ्या 122 प्रजातींच्या सुमारे 31 हजार 128 पक्ष्यांची नोंद झाली होती.

यानुषंगाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडे हतनूरसह राज्यातील सात नावे आयबीएसाठी सुचवली होती. या मध्ये हतनूर जलाशय (भुसावळ, जि.जळगाव), पेंच राष्ट्रीय उद्यान (नागपूर), फणसाड (रायगड), महेंद्री राखीव वन (अमरावती), अंबोली तेल्हारी राखीव जंगल (सिंधुदुर्ग), चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली), उजनी जलाशय (सोलापूर) या ठिकाणांचा समावेश होता. यानंतर शनिवार (दि.4)पासून नागपूरमध्ये सुरू झालेल्या 27 व्या पक्षिमित्र संमेलनात ‘आयबीए ऑफ महाराष्ट्र-प्रायोरिटी साइट्स फॉर कन्झरव्हेशन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात हतनूर जलाशयासह प्रस्तावित सातही ठिकाणांचा समावेश आहे.

पांढर्‍या पाठीचे गिधाड, रंगीत करकोचा, सर्पपक्षी, काळ्या डोक्याचा आयबी, थेसजिनस बदक, नदी सूरय या धोकाग्रस्त प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास महत्त्वपूर्ण हतनूरला आयबीए घोषित करताना आंतरराष्ट्रीय मापदंडांचा विचार करण्यात आला आहे. यापूर्वी ‘मिस्टनेट’ या आंतरराष्ट्रीय त्रैमासिकाने दखल घेतली.

यांची भूमिका ठरली महत्त्वाची
ऑक्सफर्ड पब्लिकेशन, बीएनएचएस, अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेने तयार केलेल्या ‘आयबीए ऑफ महाराष्ट्र’चे लेखक डॉ. असद रहेमानी, जफर उल इस्लाम, डॉ.राजू कसंबे, डॉ.जयंत वडतकर हे आहेत.

यांच्याहस्ते झाले प्रकाशन
साहित्यिक मारूती चित्तमपल्ली, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत, संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल पिंपळापुरे, गोपालराव ठोसर, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, आयबीसीएनचे व्यवस्थापक डॉ.राजू कसंबे आदी मान्यवरांच्या हस्ते ‘आयबीए ऑफ महाराष्ट्रा’ पुस्तकाचे शनिवारी नागपुरात प्रकाशन झाले.

40 छायाचित्रकारांची मदत
पुस्तकात महाराष्ट्रातील 40 पक्षी छायाचित्रकांच्या 70 छायाचित्रांचा समावेश आहे. दरम्यान, संमेलनात ठराव करून हतनूरसह अन्य ठिकाणी पक्षी अभयारण्याची मागणी झाली.

महाराष्ट्रामध्ये आता 27 आयबीए
महाराष्ट्रात यापूर्वी 20 आयबीए होते. नव्याने सात मिळून ही संख्या 27 झाली आहे. या मुळे दुर्मीळ, धोकाग्रस्त प्रजातींच्या पक्ष्यांचे संवर्धन आणि पक्षी अभयारण्यासाठी सरकारवर दबाव वाढेल. डॉ.जयंत वडतकर, सहलेखक, आयबीए ऑफ महाराष्ट्र.