आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावडा एक्स्प्रेसच्या पँट्री कारनेे घेतला पेट; दुर्घटना टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या डाऊन (१२८३३) अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या पँट्री कार (रसोई भंडार यान)मधील गॅस सिलिंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने अाग लागली. या वेळी क्षणाचाही विलंब करता पँट्री कारच्या व्यवस्थापकाने माेठ्या हिमतीने सिलिंडरचा काॅक बंद करून अाग पसरू दिली नाही. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता चावलखेडा रेल्वेस्थानक परिसरात घडली. दरम्यान, घटनेची माहिती कळल्यानंतर गाडीत बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेऊन गाेंधळ उडाला हाेता.

अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धरणगावकडून जळगावकडे रविवारी येत हाेती. सकाळी १०.३० वाजता चावलखेडा स्थानकाकडे येत असताना गाडीतील पँट्री कारमधील गॅस सिलिंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने धूर निघू लागला.

ही बाब व्यवस्थापक रामू गुप्ता यांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब करता तत्काळ सिलिंडरचा काॅक बंद करून अाग विझवली. त्यामुळे अाग इतरत्र पसरली नाही. तसेच या घटनेबाबत तत्काळ रेल्वेचालकाला सूचना दिली. त्यामुळे चालकाने गाडी नियंत्रणात अाणून थांबवली. अचानक गाडी थांबल्याने प्रवाशांनी गाडीखाली उतरून चाैकशी केली त्या वेळी अागीची घटना एेकून अनेकांना धक्का बसला. तसेच इतर प्रवाशांनी पँट्री कारमधून धूर निघत असल्याचे पाहून भीतीपाेटी ‘गाडी में आग लग गयी है’ अशा अाराेळ्या मारत गाडीखाली उड्या मारल्या. हे पाहून इतर प्रवासीदेखील जीवाच्या आकांताने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू लागले. एकाच वेळी शेकडो जणांनी दरवाजाकडे धाव घेतल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक जण किरकोळ जखमी झाले. आग आटोक्यात अाल्याने अनर्थ टळल्याचे एेकून प्रवासी पुन्हा गाडीत बसले. या घटनेमुळे एक्स्प्रेस एक तास उशिरा जळगाव स्थानकावर पोहाेचली. गाडीत सुमारे १८०० प्रवासी हाेते. पँट्री कारचे व्यवस्थापक गुप्ता यांनी वेळीच अाग विझवली नसती तर माेठी दुर्घटना घडली असती.

अाग पाहून महिला बेशुद्ध
पँट्रीकारमध्ये आग लागल्यानंतर गुप्ता यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नेमके याच वेळी एक महिला प्रवासी दूध घेण्यासाठी पँट्री कारमध्ये पोहाेचली. मात्र, अागीची घटना पाहून भोवळ येऊन ती महिला जागीच बेशुद्ध पडली. त्या महिलेला चावलखेडा स्थानकावर उतरवून तिच्यावर प्रथमाेपचार करण्यात अाले. त्यानंतर जळगाव रेल्वेस्थानकावर तिची जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. तडवी इंडो-अमेरिकन हॉस्पिटलचे डॉ. राणे यांनीही तपासणी केली. प्रकृती ठीक असल्याचे निदान झाल्यानंतर त्या महिलेने पुढील प्रवासाला सुरुवात केली.

दुरुस्ती करून गाडी रवाना...
चावल खेडा येथेही घटना घडली होती. सुदैवाने पँट्री कारचे व्यवस्थापक गुप्ता यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गॅस सिलिंडरची संपूर्ण दुरुस्ती करून गाडी रवाना करण्यात अाली. गोकुळ सोनोनी, पोलिस निरीक्षक, आरपीएफ, जळगाव

जळगाव, भुसावळ स्थानकावर दुरुस्ती
जळगावस्थानकावर आरपीएफचे पोलिस निरीक्षक गोकुळ सोनोनी स्टेशनमास्तर ए.एस.कुळकर्णी यांनी पँट्री कारची पाहणी केली. तात्पुरती दुरुस्ती करून गाडी भुसावळला रवाना केली. भुसावळ स्थानकावर अधिकृत गॅस एजन्सीच्या कारागिराकडून दुरुस्ती करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...