आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जल'गाव जलमय, महापालिकेची चूक, शहरवासीयांना शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तब्बल दीड महिन्यापासून दडी मारून असलेला पाऊस मंगळवारी शहरात मुक्कामी आला. तो बुधवारी दिवसभर दमदार बरसला. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले. महापालिकेने पावसाळा पूर्वीचे नाले व गटारींची सफाईची कामे केली नसल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. काही उपनगरांचा संपर्क तुटला. यात भर पडली ती क्रॉम्प्टनच्या गलथान कारभाराची. शहरात 11 ठिकाणी वृक्ष कोलमडून वीजतारांवर पडले. त्यामुळे अनेक भागात वीज खंडित झाली होती. 16 तास उलटूनदेखील वीजपुरवठा सुरळीत करण्यात क्रॉम्प्टनला यश आले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.
नगरसेविकेची धडपड यंत्रणेची उदासीनता
हरिविठ्ठल नगरातील विहिरीचे पाणी अनेक जण पिण्यासाठी वापरतात. या विहीरीला कुंपण भिंत नसल्यामुळे पावसाचे गढूळ पाणी विहिरीत जात होते. याबाबत नगरसेविका पार्वताबाई भिल यांनी महापालिका कर्मचार्‍यांना माहिती दिली. परंतु दुपारपर्यंत कुणीही कर्मचारी न आल्याने शेवटी
नगरसेविकेने यांनी स्वत:च फावडी घेऊन पाण्याला बांध घातला.
नवीन बसस्थानकाच्या आवारात असलेल्या एस.टी.वर्कशॉपमधील कर्मचार्‍यांना संततधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. शेड गळत असल्याने चिखल व ऑइलमुळे कर्मचारी घसरून पडण्याचे प्रकार दिवसभर सुरू होते. रॅममध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. अशातच रॅममध्ये वीजपुरवठा उतरल्याने कामगार धास्तावले होते. त्या वेळी वेळीच पुरवठा बंद केल्याने धोका टळला.
बीबानगराला पाण्याचा वेढा या भागाचा तुटला संपर्क

बीबानगराला पाण्याने वेढले असल्याने नागरिकांना कॉलनीत जाणे मुश्कील झाले आहे. आहुजानगराजवळील द्वारकानगरातून उताराने मनुदेवी सोसायटीत पाणी आले. मात्र, वैष्णवीदेवीनगराजवळ पाण्याला वाट मिळाली नाही. त्यामुळे पाणी तुडुंब भरले असून परिसरात तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. पालिकेने जेसीबीने पाण्याला वाट करून देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संकुलात साचले तळे
पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मनपाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. गोलाणी, फुले, बीजे व्यापारी संकुलातील तळमजल्यांवरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्‍यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. फक्त किराणा व दूध विक्री केंद्रावर ग्राहकांची वर्दळ दिसून आली.

भूविकास बॅँकेलगतचे पडलेले झाड
11 ठिकाणी वृक्ष पडले

जिल्हाधिकार्‍यांच्या निवासाजवळील झाड पोलिस मुख्यालयालगत असलेले झाड, भाजपच्या कार्यालयासमोर भूविकास बॅँकेलगत असलेले लिंबाचे 40 वर्ष जुने झाडं, महेश प्रगतीजवळ एक, फॉरेस्ट कॉलनीत लिंबाचे, पिंप्राळा रस्त्यावर, नेरी नाक्याजवळील वानखेडे सोसायटीत गुलमोहर, महाबळमध्ये, वाघनगर, क्रीडा संकुलाजवळ वृक्ष उन्मळून पडले. राष्ट्रवादी कार्यालयामागील अटल हॉस्पिटलजवळ झाड पडल्याने विजेचा खांब वाकला होता.

शुक्रवारचा संभाव्य पुरवठा
नटराज टॉकीज ते चौघुलेमळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, केसीपार्क, गेंदालाल मिल हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, जुने जळगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज परिसर, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, क ासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी परिसर, सुप्रीम कॉलनी, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी.
दम‘धार’मुळे आज पाणीपुरवठा बंद

विजेची समस्या सोडवण्यासाठी यांच्याशी साधावा संपर्क
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर क्रॉम्प्टनच्या कार्यालयात व अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर कोणीही प्रतिसाद दिला नाही किंवा तक्रार करूनही समस्या सुटली नाही. तर नागरिकांनी शहर अभियंता मुकेश चौधरी यांच्याशी 8390909697 या क्रमांकावर संपर्क साधावा.

निम्मे शहरात वीजपुरवठा बंद
पावसाने खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात क्रॉम्प्टनला यश न आल्याने अध्र्या शहरात वीजपुरवठा बंद होता. गणेश कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री 10.30 वाजेपासून वीज बंद होती. तर रामानंदनगर, खोटेनगर, कोर्टापासून रिंगरोडकडील भागात तसेच अनेक भागात पहाटेपासून वीजपुरवठा बंद झाला होता. विवेकानंदनगरात बुधवारी सायंकाळपर्यंत वीज गुल होती. बुधवारीदेखील हिच स्थिती असल्याने रात्रीप्रमाणे दिवसादेखील नागरिकांना वीजपुरवठय़ापासून वंचित राहावे लागले. वीजपुरवठा बंद असल्याचे कारण सांगितले जात नसल्याने अनेकांनी क्रॉम्प्टन कार्यालयात धाव घेऊन कर्मचार्‍यांशी वादही घातला.

दिव्य मराठी’कडे मांडली व्यथा
गिरणा टाकीजवळील लक्ष्मीनगरातील रहिवासी मनीषा लोढा यांनी क्रॉम्प्टनकडून प्रतिसाद मिळाला नाही. व्यंकटेश मंदिर परिसराजवळील अमोल लाहोटी यांनी क्रॉम्प्टनचे फोन लागत नसल्याचे सांगितले. हिरा-गौरी पार्कमधील विनोद पाटील यांनी विजेच्या पोलवरील वायर तुटल्याची तक्रार केली. क्रॉम्प्टनचे कर्मचारी पाहणी करून गेले. मात्र, सायंकाळपर्यंत दुरुस्ती केलेली नाही. विवेकानंदनगरात रात्रीपासून दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नसल्याचे रमेश जोशी यांनी सांगितले. बिबानगरात रात्री उशिरापर्यंत पुरवठा बंद होता. याबाबत वीज मंडळाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नसल्याचे किरण महाजन यांनी सांगितले.

प्रभात कॉलनीतील डॉ.विजय फिरके यांनी क्रॉम्प्टनकडे वेळोवेळी तक्रार करून त्यांची दखल घेतली नाही.

कानळदा रोडवरील त्रिभुवन कॉलनीत पाणी साचले. त्यात वीज नसल्याने हाल झाल्याचे गणेश परदेशी यांनी सांगितले.
हायवे दर्शन कॉलनीतील विजय पाटील यांच्या घराला पुरवठा करणारी वायर तुटून पडल्याच्या तक्रारीसाठी 30 वेळा फोन करूनही क्रॉम्प्टनने प्रतिसाद दिला नाही. नंदनवन ले-आऊटमध्ये अभय उजागरे यांनाही असाच अनुभव आला.

या भागात घरात शिरले पाणी
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक खोलगट भागात पाण्याचे तळे साचले होते. उपनगरात अनेक ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण झाल्याने वाट मिळेल तेथे पाण्याचे लोंढे वाहत जाऊन अनेक घरात पाणी गेले. आशाबाबानगर, हरिविठ्ठलनगर, आरएमएस कॉलनी, कानळदा रोडवरील त्रिभूवन कॉलनी, विवेकानंदनगर, या भागातील घरांमध्ये पाणी शिरले. एमआयटी कॉलनीजवळील जेडीसीसी बॅँक बंगलो या भागात रस्त्यावर चार फूट पाणी होते. तर कुंपणाच्या आत दोन फूट पाणी शिरल्याचे अँड. विजय काबरा यांनी सांगितले.