आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकर्स दाद देईनात; पालिका न्यायालयाचे दार ठोठावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून शहरातील हॉकर्संच्या स्थलांतराची कारवाई सुरू केली आहे. परंतु हॉकर्स पुन्हा त्याच जागेवर बसत असल्याने महापालिका त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे. तरीही हॉकर्स दाद देत नसल्याने अखेर महापालिका न्यायालयाचे दार ठोठवण्याच्या तयारीत आहे.
हॉकर्सने पूर्वीच्याच जागेवर बसण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री आदींकडे वेळोवेळी निवेदन पाठवले आहेत. त्या अनुशंगाने राज्य शासनाने महापालिकेकडून माहिती मागवली होती. त्या अनुषंगाने शहरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या हॉकर्स स्थलांतर कारवाईसंदर्भातील सविस्तर अहवाल शनिवारी महापालिकेतर्फे राज्य शासनाला पाठवण्यात आला. शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक बळीरामपेठ या ठिकाणच्या हॉकर्सचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे दिसून येत आहे. पर्यायी जागा दिल्यानंतर सुद्धा हॉकर्स नवीन जागेवर व्यवसाय करण्यास तयार नाहीत. त्यामुळे दर १०-१५ दिवसांनी हॉकर्सवर कारवाईचा बडगा उचलावा लागत आहे. यातच हॉकर्सने पूर्वीच्या जागी बसू द्यावे, नवीन जागांवर अनेक अडचणी अाहेत, अशा संदर्भातील निवेदन राज्यशासनाकडे पाठवण्यात आली आहेत.
मनपानेअशी पाठवली माहिती
हॉकर्सांच्या निवेदनांच्या संदर्भात पुढे काय कार्यवाही करावी? तसेच हॉकर्सला उत्तर देण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्यानुसार महापालिकेच्या महासभेने वेळोवेळी केलेले ठराव, औरंगाबाद उच्च न्यायालय दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश, जळगाव शहरात हॉकर्स प्रतिनिधी, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत झालेल्या समन्वय बैठकीचा अहवाल, अशी सर्व कागदपत्रे पाठवली आहेत. त्यावर अागामी काळात राज्य शासन काहीतरी निर्णय घेऊ शकते.

तत्पूर्वी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री तर दुसरीकडे महापालिकाच आता हॉकर्सच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्य बाजारपेठेसह अन्यत्र रस्त्यांवर असलेल्या तसेच नव्याने होणाऱ्या अतिक्रमणाकडेही महापालिकेची वक्रदृष्टी पडल्याने अितक्रमणधारक चांगलेच धास्तावलेले आहेत.

आम्ही न्यायालयात जाणार
^वारंवार बैठकाझाल्या, महासभेचे ठराव झाले, न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. असे असतानाही हॉकर्सकडून अादेशाचे पालन होत नसेल तर आता महापालिका हॉकर्सच्या विरुद्ध न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका

हॉकर्सने घेतली आयुक्तांची भेट
सुभाष चौक, बळीरामपेठ, शिवाजी रोड परिसरातील हॉकर्सने शनिवारी आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली. सण, उत्सवाच्या काळात जुन्या जागेवर व्यवसाय करू देण्याची विनंती या वेळी हॉकर्सतर्फे करण्यात अाली. मात्र, आयुक्त सोनवणे यांनी या संदर्भात त्यांना परवानगी दिलेली नाही.

तीन हातगाड्या, ५० बॅनर्स जप्त
शनिवारीही अतिक्रमण विभागाची कारवाई सुरूच होती. शनिवारी सुभाष चौकात भाजी विक्रेत्यांच्या तीन हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील अनधिकृत बॅनर्स पोस्टर्सवरही कारवाई करण्यात आली. यात टॉवर चौक ते संभाजीनगर, आरटीओ कार्यालय परिसर, काव्यरत्नावली चौक ते शिरसोली नाका, शिरसोली नाका ते मोहाडी रोड, या भागातील रस्त्यालगत लावलेले ५० बॅनर्स जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...