जळगाव - ‘टी-२०विश्वचषक’नंतर अाता आयपीएलच्या मॅचेसचा सट्टे बाजार तेजीत सुरू झाला आहे. शहरात बुकींच्या संपर्कात राहून हवाला पद्धतीने सट्टा खेळला जात अाहे. सटोड्यांना सोपे जावे म्हणून गुगलमधील एका संकेतस्थळावर सट्ट्याचे भाव दाखवले जात आहेत.
विश्वचषक टी-२० स्पर्धेत बुकींनी कोट्यवधींची कमाई केली. त्या पाठोपाठ सध्या आयपीएलच्या मॅचेस सुरू आहेत. आयपीएलमध्ये जसा खेळाडूंचा लिलाव महागडा होतो, तसाच त्यांच्यावर लावला जाणारा सट्टादेखील रग्गड आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या संघावर सटोड्यांंचा जास्त भरवसा असल्यामुळे त्यांचा भाव अत्यंत कमी पैशांनी सुरू होतो. मात्र, शेवट वाईट झाल्यानंतर बुकींचा गल्ला चांगलाच गलगलतोे. जळगाव शहरातही सटोडीयांची रोजच्या सामन्यांवर सट्टा लावण्यास अधिक पसंती अाहे. हवाला पद्धतीने मोबाइलच्या माध्यमातूनच संघ, खेळाडूंच्या नावाने पैसे लावले जात आहेत. यात संकेतस्थळावर प्रत्येक बॉलनंतर भाव कमी-जास्त होताच पैशांची रेलचेल होते आहे. प्रमुख बुकींच्या संपर्कात राहून शहरातील उच्चभ्रू भागात सटोडे दररोज खेळ करीत आहेत. भुसावळ शहरात मुख्य बुकी असल्याचे या पूर्वीही सूत्रांनी सांगितले होते. आता आयपीएलसाठी देखील भुसावळ, इंदूर, अहमदनगर येथून हवाला पद्धतीने खेळ सुरू आहे. ‘बेट फेअर’ नावाच्या परवानाधारक अधिकृत संकेतस्थळावर रोजचे भाव दिसत आहेत.
प्लेयर्सवर पैशांची लयलूट : आयपीएल संपूर्णपणे खेळाडूंवर चालणारा खेळ आहे. यात वर्षभरात उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंची बोली लावून त्यांना विविध संघासाठी खरेदी केले जाते. सहाजीकच जे खेळाडू महागडे असतात त्यांच्या खेळावर जगभराचे लक्ष लागून असते. अगदी हेच सूत्र सट्टा बाजारात पाळले जाते आहे. महागड्या खेळाडूंची प्रत्येक धाव, चाैकार, षटकारवर तसेच खेळाडू गोलंदाज असेल तर त्यांच्या डॉट बॉल, विकेट यावर कोट्यवधी रुपयांची लयलूट केली जाते आहे. प्रत्येक बॉलवर विविध पैजा लावल्या जात असल्याने दोन्ही इनिंगच्या एकूण ४० ओव्हर पूर्ण होईपर्यंत कोट्यवधींचा सट्टा खेळला जातो आहे.
सटोड्यांना आवरणे कठीण
ऑनलाइनसटोड्यांना आवर घालणे कठीण काम अाहे.आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी लॅपटॉप मोबाइलवर सट्टा घेतला जात होता. विश्वचषक, अायपीएलदरम्यान शहरात अनेक ठिकाणी लपूनछपून सट्टेबाजी चालत होती. परंतु ऑनलाइनचा नवा फंडा आल्यामुळे नेमका सट्टा कोण लावतो आणि कोण घेतो हे शोधून काढणेही अवघड होत चालले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने थेट वेबसाइटवर जाऊन पैसे लावणे सोपे झाले असून, त्याचाच फायदा सट्टा खेळणाऱ्यांना होत आहे.
संकेतस्थळ अधिकृत
‘बेटफेअर’ हे संकेतस्थळ अधिकृत आहे. त्यावर फुटबॉल, रेसिंग, कसीनो आदी प्रकारच्या शर्यतींची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलचा सामना सुरू झाल्यानंतर लगेचच त्यावर क्रिकेटच्या संदर्भातील माहिती अपलोड होते. यात सट्ट्याचा भावही जाहीर केला जातो. त्यानुसार सटोडे आपल्या मनाप्रमाणे पैसे लावतात. बुकींना फोन करून पैज लावली जाते. हा पूर्णपणे हवाला पद्धतीने चालणारा खेळ असल्यामुळे बुकी, सटोड्यांना शोधणेही पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. घरबसल्या सट्टा खेळण्याला सटोडे जास्त पसंती देताना दिसून येत आहेत.